BMC Elections: मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही..; तेजस्विनी पंडितच्या पोस्टची चर्चा
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मतदानानंतर लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या पोस्टद्वारे तिने मार्करच्या शाईवरूनही टोला लगावला आहे. तसंच माझं मत मराठी माणसासाठी असं तिने म्हटलंय.

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बेधडक मतांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखली जाते. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवात मतदान झालं. यावेळी तेजस्विनीनेही मतदान केलं आणि मतदानानंतर सोशल मीडियावर स्वत:चा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तेजस्विनीच्या बोटावर शाईची खूण पहायला मिळतेय. हा फोटो पोस्ट करत तेजस्विनीने आजचं मत मराठी माणसासाठी असल्याचं म्हटलंय. त्याचसोबत तिने मार्करच्या शाईवरूनही टोला लगावला आहे.
तेजस्विनी पंडितची पोस्ट-
‘माझा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला. मी लहानाची मोठी मराठी भाषा बोलतच झाले. याच मराठी भाषेवर कामारूपी स्वतःचं पोट भरत आले. माझी भाषा टिकली तर माझं काम दिसेल आणि तरंच माझं अस्तित्वही असेल. म्हणूनच आजचं मत त्या मराठी माणसासाठी, ज्याच्या रक्तात मराठी सळसळते आणि ज्याच्या हृदयात आजन्म महाराष्ट्र विराजमान आहे. जय महाराष्ट्र,’ अशी पोस्ट तेजस्विनीने लिहिली आहे. या पोस्टच्या अखेरीस तिने म्हटलंय की, ‘बाकी या वर्षी त्या मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया.’
View this post on Instagram
महापालिका निवडणुकीत मतदानाच्यावेळी मतदारांच्या बोटावर मार्करने लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप मतदार आणि राजकीय नेत्यांकडून झाला. या आरोपांनंतर मतदानासाठी वापरण्यात आलेल्या शाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. अनेक ठिकाणी मतदानानंतर बोटावरील शाई लगेच पुसली गेल्याच्या तक्रारी मतदारांनी सोशल मीडियावर केल्या. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शिवसेना (शिंदे) प्रवक्ते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी त्याकरडे लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी दुबार मतदानाची भीती व्यक्त केली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली.
मतदानासाठी वापरण्यात आलेल्या शाईचा दर्जा तसंच शाई पुसली जात असल्याबद्दल पसरविण्यात येणाऱ्या अफवांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वाघमारेंनी स्पष्ट केलं. बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं गैरकृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.
