मोठी लढाई लढू.., राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितच्या पोस्टची चर्चा; नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये खास पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरेंचा फोटो शेअर करत तिने 'मोठी लढाई लढू मातीसाठी रं गड्या' असं म्हटलंय. तेजस्विनीच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय.

राज्यातील 29 महापालिकांसाठी आज (गुरुवार) मतदान पार पडतंय. महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले आहेत. अशातच आपली मतं बेधडकपणे मांडण्यासाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरेंसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. तेजस्विनीने याआधीही राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्यांच्यासाठी खास कविता लिहिली आहे. ‘मोठी लढाई लढू मातीसाठी रं गड्या..’ असं तिने म्हटलंय.
तेजस्विनी पंडितची पोस्ट-
‘मोठी लढाई लढू मातीसाठी रं गड्या, मनगटाचं जोर लावून.. तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी,’ अशा ओळी तेजस्विनीने राज ठाकरेंसाठी लिहिल्या आहेत. तेजस्विनी अनेकदा मोकळेपणे राज ठाकरेंचं समर्थन करताना दिसते. सोशल मीडियावर ती त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टही लिहिते. ‘हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा. इतका नि:स्वार्थी भावना असणारा आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता. साहेब तुमच्या राजकारणाविषयी, तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही. किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे. तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा. आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे,’ अशी पोस्ट तेजस्विनीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिली होती.

कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे मी एका मुलाखतीत म्हणालो होतो आणि त्या मुलाखतीपासूनच आम्ही एकत्र येण्याला सुरुवात झाली, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईसाठी शिवसेना आणि मनसेची युती जाहीर केली होती. मुंबईमध्ये मराठी आणि आमचाच महापौर होणार, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.
राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान होत असून त्यात 15,931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2869 जागा आहेत. तर एकूण मतदार 3 कोटी 48 हजार आहेत. मुंबईत एकसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने मुंबईकरांना एकच मत देण्याचा अधिकार आहे. उर्वरित 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने तिथे मतदारांना चार मतं द्यावी लागणार आहेत.
