‘साधी ओळखही नाही तरी माझ्यासाठी खूप केलं’, आर्थिक अडचणीत असलेल्या शगुफ्ताने मानले रोहित शेट्टीचे आभार!

शगुफ्ता अली यांची ही अवस्था पाहून दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) तातडीने त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्याने काही पैसे अभिनेत्रीच्या खात्यात ट्रान्सफर केले.

‘साधी ओळखही नाही तरी माझ्यासाठी खूप केलं’, आर्थिक अडचणीत असलेल्या शगुफ्ताने मानले रोहित शेट्टीचे आभार!
शगुफ्ता-रोहित

मुंबई : टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री शगुफ्ता अली गेल्या काही दिवसांपासून कामाअभावी आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे आर्थिक अडचणीत सापडली आहे. शगुफ्ता अली (Shagufta Ali) यांनी एका मुलाखती दरम्यान ही माहिती दिली होती. शगुफ्ता अली यांची ही अवस्था पाहून दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) तातडीने त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्याने काही पैसे अभिनेत्रीच्या खात्यात ट्रान्सफर केले. चित्रपट निर्माते व भारतीय चित्रपट व दूरदर्शन संचालक संघाचे अध्यक्ष अशोक पंडित (Ashok Pandit) यांनी ही माहिती दिली आहे (Actress Shagufta Ali gets financial help from Director Rohit Shetty).

शगुफ्ता यांनी अलीकडेच, आपल्याकडे काहीच काम नाही, असे म्हणत आपली व्यथा व्यक्त केली होती. याशिवाय काही काळ त्यांची तब्येतही ठीक नसल्याने आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे डोळ्याला देखील त्रास होत आहे. पिंकविलाशी बोलताना अशोक पंडित म्हणाले की, ‘जेव्हा मला शागुफ्ताची अवस्था कळली तेव्हा मी त्यांच्याशी बोललो. त्यांची समस्या समजल्यानंतर मी रोहितशी देखील बोललो आणि त्याने तातडीने मदत करण्यास सहमती दर्शवली. रोहितने शगुफ्तासाठी काही रक्कम दान केली म्हणूनच आम्ही त्याचे खूप आभारी आहोत. आता मी इतर कलाकारांनाही विचारणा करत आहे आणि मला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शगुफ्ताने मानले रोहितचे आभार

शगुफ्ता अली यांनी पिंकविलाबरोबर बोलताना याबद्दल सांगितले की, ‘हे सर्व फार लवकर झाले आणि मी त्यांची खूप आभारी आहे. देव त्यांना नेहमी आनंदी ठेवो. आम्ही कधी भेटलो नाही आणि कधीच एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलं नाही. याशिवाय आम्ही कधीही फोनवर देखील बोललो नाही आणि तरीही त्यांनी माझ्यासाठी बरेच काही केले. सध्या डॉक्टर व्यस्त आहेत, म्हणून मी पुढच्या आठवड्यात त्याच्याबरोबर अपॉईंटमेंट घेणार आहे आणि माझे उपचार पुन्हा सुरू होतील.’

2018 पासून कोणतेही काम नाही!

यापूर्वी पीटीआयशी बोलताना शगुफ्ता यांनी सांगितले होते की, त्यांच्याकडे 2018पासून काहीच काम नाही. अभिनेत्री म्हणाली होती की, ‘मी बराच काळ उपचार घेत आहे आणि त्याचा खर्च देखील खूप जास्त आहे. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. मी स्वत: एकटीच हा खर्च पेलू शकत नव्हते, म्हणून इंडस्ट्रीतील मित्र परिवाराची मदत घेतली. माझ्यासाठी 2018पासूनच लॉकडाऊन सुरु आहे. कामाअभावी माझा ताणतणाव वाढत गेला आणि यामुळे मधुमेहाची समस्याही वाढली. मी आधी माझी कार आणि दागिने विकले. सुरुवातीला कोणाच्याही मदतीशिवाय हे सर्व हाताळले. माझ्याकडे कोणतीही स्थिर ठेव नाही, म्हणून हे सर्व विकल्यानंतर मला काही पैसे मिळाले.’ आपल्याला सुमित राघवन, सुशांत सिंह आणि नीना गुप्ता यांच्याकडूनही मदत मिळाल्याचे शगुफ्ताने सांगितले होते.

बर्‍याच लोकप्रिय आणि हिट शोमध्ये केलेय काम

शगुफ्ता यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात 1980मध्ये केली होती. ‘हीरो नंबर 1’, ‘मेहंदी’ आणि ‘सिर्फ तुम’सारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. या अभिनेत्रीला तिची खरी ओळख 1998चा शो ‘सांस’ मधून मिळाली, ज्यामध्ये ती नीनासोबत होती. यानंतर, ‘संजीवनी’, ‘साथ निभाना साथिया’, ‘वो रहेने वाली महलों की’ आणि ‘ससुराल सिमर का’ सारख्या अनेक लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये शगुफ्ताने काम केले आहे.

(Actress Shagufta Ali gets financial help from Director Rohit Shetty)

हेही वाचा :

15 फिल्म, 20 मालिकांमध्ये दमदार काम, कॅन्सरनं गाठलं, आर्थिक विवंचना, घरातलं सामान विकण्याची हिरोईनवर वेळ

PHOTO | शेवटची गळाभेट, दिलीप कुमारांना मिठी मारून रडल्या पत्नी सायरा बानो, साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला दिला निरोप!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI