शेवटी आलो, शेवटीच जाणार…ट्रॉफी मीच जिंकणार!; सूरज चव्हाणला ‘गुलीगत’ विश्वास
Suraj Chavan on Bigg Boss Marathi Trophy : बिग बॉसच्या घरात आता खऱ्या अर्थाने खेळात रंगत आली आहे. स्पर्धकांमध्ये आता अटीतटीची लढाई सुरु आहे. सूरज चव्हाण याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शेवटी आलो, शेवटीच जाणार..., असं तो म्हणतोय, वाचा सविस्तर...
बिग बॉस मराठीच्या घरात काय घडतंय? काय बिघडतंय? याकडे सर्वांचंच लक्ष आहे. सगळेच स्पर्धक ही स्पर्धा जिंकण्यासाठी खेळत आहेत. बिग बॉसच्या घरातील चर्चित असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे सूरज चव्हाण… सूरज चव्हाणचा साधेपणे लोकांना भावतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सामान्य घरातील मुलगा ते बिग बॉसमधील त्याचा प्रवास चाहत्यांनी जवळून अनुभवला आहे. आता बिग बॉसच्या घरातील त्याचा खेळही प्रेक्षकांना आवडतो आहे. बिग बॉसच्या घरात सूरजने ट्रॉफी जिंकण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
सूरज म्हणतो, ट्रॉफी जिंकणारच!
बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात सूरज चव्हाण जिंकण्याचा विश्वास व्यक्त करताना दिसत आहे. सूरज चव्हाण बिग बॉसचा खेळ त्याच्या गुलीगत स्टाईलने खेळत आहे. आजच्या भागात सूरज चव्हाण अभिजीतला आपणच ट्रॉफी जिंकणार असल्याचं सांगताना दिसेल. बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी मीच नेणार, असं सूरज म्हणतो. त्यावर अभिजीत त्याला म्हणतो, तुझा हक्क आहे.
सूरज म्हणतो की, बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीला मी कोणाला हात लावू देणार नाही… त्यावर अभिजीत सूरजला म्हणतो, तू शेवटून पहिला आहेस! त्यावर सूरजही तसंच उत्तर देतो. शेवटी आलो… शेवटीच जाणार… ट्रॉफी घेऊनच जाणार, असं सूरज म्हणतो. तू जिंकलास तर आम्हालाही आनंद होईल, असं अभिजीत सूरजला म्हणतो. बिग बॉस जिंकलो की सगळ्यात आधी जेजुरीला जाणार आहे. त्यानंतर आई मरीमाताकडे जाणार… फक्त ही इच्छा पूर्ण व्हावी, असंही सूरज म्हणतो.
View this post on Instagram
सूरजला प्रेक्षकांचा पाठिंबा
टिक टॉकच्या पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीगत सूरज चव्हाण. महाराष्ट्रात सूरज चव्हाण याचा मोठा चाहतावर्ग आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता ‘बिग बॉस मराठी’चं घर गाजवतानाही दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’चं घर, तिथले सदस्य, त्यांचं राहणीमान या सर्व गोष्टी सुरुवातीला सूरजसाठी खूप नव्या होत्या. त्यामुळे सुरुवातीचा एक आठवडा तो शांत होता.
आता दुसऱ्या आठवड्यात सूरजचा महाराष्ट्रभर त्याचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळतो आहे. गुलीगत सूरज चव्हाण त्याच्या स्टाईलने खेळून ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. त्याचा खेळीचं सर्वत्र चांगलच कौतुक होत आहे. आता आलेल्या प्रोमोत तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याची इच्छा बोलून दाखवताना दिसतो आहे.