‘द बंगाल फाइल्स’वरून कोलकातामध्ये जोरदार गोंधळ; अग्निहोत्री म्हणाले ‘हुकूमशाही चालणार नाही..’
'द बंगाल फाइल्स' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान कोलकातामध्ये बराच गोंधळ झाला. ऐनवेळी पोलिसांनी घटनास्थळी येऊन ट्रेलर लाँच करण्यास मनाई केली. त्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्यावरून वाद सुरू आहे. 16 ऑगस्ट रोजी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आणि ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात जोरदार हंगामा झाला. आधी हा ट्रेलर दुपारी 12 वाजता प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर त्याला विलंब झाला. जवळपास तासाभराच्या प्रतीक्षेनंतर कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी पोलिसांनी तिथे येऊन कार्यक्रम थांबवण्याचा आदेश दिला. या संपूर्ण घटनेवर विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमचा आवाज दाबला जातोय, असा आरोप त्यांनी पोलिसांवर केला.
“मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती कळवू इच्छितो. मला आताच समजलंय की ते लोक इथे आले आहेत आणि त्यांनी इथल्या सर्व वायर कापल्या आहेत. याआधी तुम्ही कधी असं घडताना पाहिलंय का, की कोणीतरी खाजगी हॉटेलमध्ये येऊन वायर कापतो. हे सर्व कोणाच्या आदेशाने घडतंय, हे मला माहीत नाही. हे सर्व का घडतंय, तेही मला माहीत नाही. ‘द बंगाल फाइल्स’ हा एक चित्रपट आहे, जो पाहिल्यानंतर प्रत्येक बंगाली माणूस अभिमानाने भारताच्या त्या सत्याबद्दल जाणून घेईल. लोकांना हे सत्य कळू नये, असं वाटणारे लोक कोण आहेत,” असा सवाल अग्निहोत्री यांनी केला.
याविषयी ते पुढे म्हणाले, “आमच्या मागे कोण आहे, याचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे. आमच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल झाले आहेत. त्यावर स्थगिती कशी मिळवायची यासाठी आम्ही दररोज वकिलांशी भांडतोय. जेव्हा आम्ही इथे आलो, तेव्हा आम्हाला कळलं की ट्रेलर लाँच करण्यास मनाई केली जात आहे. हे एक खाजगी हॉटेल आहे, याआधी आम्ही कधीच असं घडनाता पाहिलं नाही.”
‘द बंगाल फाइल्स’ची कथा विवेक अग्निहोत्री यांनी लिहिली आहे आणि त्यांनीच त्याचं दिग्दर्शनही केलं आहे. तर अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. यामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या भूमिका आहेत. येत्या 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी विवेक अग्निहोत्री यांचे ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताश्कंद फाइल्स’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
