The Conjuring Last Rites : कापरं भरवणारे सीन्स, भीतीने वळेल बोबडी; आठवडाभरात छप्परफाड कमाई
The Conjuring Last Rites : 'द कॉन्जुरिंग: लास्ट राइट्स' हा हॉरर चित्रपट 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. कॉन्जुरिंग सीरिजमधला हा चौथा चित्रपट आहे.

भयपटांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. कितीही कापरं भरवणारी दृश्ये असली, भीतीने पडद्यासमोर डोळेही उघडत नसले तरी थिएटरमध्ये जाऊन असे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. भारतीय चित्रपटांमध्ये इतका हॉरर का दाखवला जात नाही, अशीही तक्रार अनेकदा केली जाते. त्यामुळे असा प्रेक्षक आपोआपच हॉलिवूड किंवा इतर भाषांमधील भयपटांकडे वळतो. असंच काहीसं सध्या ‘द कॉन्जुरिंग: लास्ट राइट्स’ या चित्रपटाच्या बाबतीत घडतंय. 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला थिएटरमध्ये एक आठवडा पूर्ण झाला आहे आणि अवघ्या सात दिवसांत त्याने कमाईचे मोठमोठे विक्रम रचले आहेत.
‘द कॉन्जुरिंग: लास्ट राइट्स’ची भारतातील कमाई-
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला 50.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवसाची कमाई 5 कोटी आणि 5.5 कोटी रुपये इतकी होती. सहाव्या दिवशी या चित्रपटाने 3.19 कोटी आणि सातव्या दिवशी जवळपास 3 कोटी रुपये कमावले. त्यामुळे आतापर्यंत भारतातील कमाईचा आकडा 67.19 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परंतु हा आकडा अंतिम नाही. यात आणखी बदल होऊ शकतात.
View this post on Instagram
- ‘कोईमोई’च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट तब्बल 55 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 485 कोटी रुपये इतका आहे. हा ‘कॉन्जुरिंग’च्या फ्रँचाइजीमधील जरी सर्वांत महागडा चित्रपट असला तरी हॉलिवूड चित्रपटांच्या तुलनेत याचा बजेट कमीच आहे.
- ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार पाच दिवसांत या चित्रपटाने जगभरात 1925 कोटी रुपये कमावले आहेत. यात जर आजचं भारतातील कलेक्शन जोडलं तर कमाईचा आकडा जवळपास 1991 ते 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
- जर या चित्रपटाच्या कमाईची टक्केवारी त्याच्या बजेटशी तुलना केली तर ती सुमारे 410 टक्क्यांपर्यंत पोहोचते. याचाच अर्थ असा आहे की ‘द कॉन्जुरिंग : लास्ट राइट्स’ या चित्रपटाने आतापर्यंतच्या बजेटपेक्षा चारपट अधिक कमाई केली आहे.
या चित्रपटातही पॅट्रिक विल्सन आणि वेरा फार्मिगा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाने 2025 या वर्षातील भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप पाच हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
