सिनेमातील बाप माणसं राजकारणात फेल?; अमिताभपासून गोविंदापर्यंत…

राजकारण आणि बॉलिवूड याचं अतूट नातं आहे. अनेक सिनेमात यश मिळाल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टारनी राजकारणात आपले हातपाय मारण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात आल्यानंतर यश मिळालं. पण त्यांना दीर्घकाळ टिकता आलं नाही. दक्षिणेत ज्या प्रमाणे कलाकार राजकारणात दीर्घकाळ टिकतात, तसं बॉलिवूडकरांच्या बाबतीत घडलेलं नाही. राजकारणात आल्यावर पश्चात्ताप झाल्याने त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागला आहे.

सिनेमातील बाप माणसं राजकारणात फेल?; अमिताभपासून गोविंदापर्यंत...
हे सेलिब्रिटी राजकारणात आले पण...
| Edited By: | Updated on: Mar 23, 2024 | 4:29 PM

गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडकरांनी राजकारणाकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला आहे. आपल्या प्रसिद्धीच्या वलयामुळे बॉलिवूड अभिनेते निवडूनही येतात. काही लोक राजकारणात बराच काळ बॅटिंग करतात तर काही लोक राजकारणातून लवकर एक्झिट घेतात. शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, स्मृती ईराणी सारखे स्टार बॉलिवूडमध्ये पाय रोवून आहेत. तर गोविंदा, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत सारख्या कलाकारांना राजकारणातून गाशा गुंडाळावा लागला आहे. यश मिळाल्यानंतरही बॉलिवूडचे हे तारे राजकारणात रमले नाही. त्यांची प्रत्येकाची काही ना काही कारणे आहेतच.

अमिताभ अलाहाबादमधून जिंकले

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी 1984मध्ये अभिनयातून ब्रेक घेत राजकारणात पाय ठेवला. त्यांचे मित्र राजीव गांधी यांच्या सांगण्यावरून अमिताभ राजकारणात आले होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर अलाहाबादमधून (आताचे प्रयागराज) निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अमिताभ जिंकले होते. मात्र तीन वर्षानंतर बोफोर्स घोटाळ्याच्या वादामुळे त्यांनी राजकारण सोडलं. 1987मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राजकारणातून संन्यास घेतला.

राजकारण का सोडलं? यावर अमिताभ यांनी 1998मध्ये सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये भाष्य केलं होतं. मी राजकारणी नव्हतो. राजकारणात जाणं हा भावनिक निर्णय होता. राजीव गांधी आणि आमच्या कुटुंबाची मैत्री होती. या मैत्रीमुळे मी राजकारणाकडे ओढलो गेलो होतो, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं होतं.

करिअरमधील सर्वात मोठी चूक

प्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांनीही राजकारणात आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला होता. 2004 मध्ये गोविंदा यांनी काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा मोठा विजयही झाला होता. विरार का छोरा म्हणून मतदारांनी त्यांना निवडून दिले होते. पण पुढच्याच लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या या निर्णयावर त्यांनी 2013च्या एका मुलाखतीत राजकीय प्रवेशावर भाष्य केलं होतं. राजकारणात जाणं ही आपल्या करिअरमधली सर्वात मोठी चूक होती, असं गोविंदाने म्हटलं होतं. गोविंदा संसदेत यायचे नाहीत. मतदारसंघात दिसायचे नाहीत. त्यामुळे त्यांना मीडियाने धारेवर धरलं होतं. त्यामुळेच गोविंदा यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता.

पराभव आणि राजीनामा

2019मध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी मुंबई नॉर्थमधून निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांना यश आलं नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसचा राजीनामा देताना त्यांनी घराणेशाहीचं कारण दिलं होतं. घराणेशाहीमुळे काम करता येत नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

रजनीकांत मागे हटले

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी 2017मध्ये ‘रजनी मक्कल मंडराम’ नावाचा पक्ष स्थापन केला. आपण केवळ अध्यात्मिक राजकारण करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे रजनीकांत साऊथवर ताबा मिळवतील असं सांगितलं जात होतं. पण 2021मध्ये रजनीकांत यांनी आरोग्याचं कारण देत राजकारणात येत नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच रजनीकांत यांचा पक्ष बंद पडला होता.

सनी देओल लढणार नाही

2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सनी देओल यांनी काँग्रेस उमेदवार सुनील जाखड यांचा पराभव केला होता. सनी देओल गुरुदासपूरमधून विजयी झाले होते. खासदार झाल्यानंतर सनी देओल आपल्या मतदारसंघात आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. खासदार हरवला आहे, अशा आशयाचे पोस्टरही मतदारसंघात लागले. मतदारांचा हा रोष पाहता सनी देओल यांनी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला.