रात्री एखाद्या व्यक्तीची आठवण सतावत असेल तर ऐका हे गाणं, 63 वर्षापासून लोकांचं आवडतं
जर तुम्हाला रात्री एखाद्या खास व्यक्तीची आठवण आली तर ऐका लता मंगेशकर यांचं 63 वर्ष जुनं गाणं, प्रत्येक शब्दात दडलंय दुःख. आजही आवडीने ऐकतात लोक.

हिंदी चित्रपटातील जुन्या गाण्यांची जादू आजही कायम आहे. विशेषतः रात्रीच्या शांत वातावरणात, मंद प्रकाशात आणि मन उदास असताना काही गाणी ऐकली की त्यातील प्रत्येक शब्द आपल्या भावनांशी जोडला जातो. असंच एक सदाबहार आणि दर्दभऱ्या भावनांनी भरलेलं गाणं म्हणजे ‘खुशी भी मिली हमको’. तब्बल 63 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बिन बादल बरसात या चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या बिन बादल बरसात या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्योती स्वरूप यांनी केलं होतं. हा चित्रपट केवळ प्रेमकथेपुरता मर्यादित नव्हता तर त्यात प्रेम, धोका, शाप आणि पुनर्जन्माचा अनोखा मिलाफ पाहायला मिळाला.
चित्रपटाच्या कथेत एका ठाकूर कुटुंबावर असलेल्या शापाचं गूढ दाखवण्यात आलं आहे. ठाकूर कुटुंबातील एका पुरुषाने एका बंजारी मुलीला धोका दिल्यानंतर तिच्या कुटुंबाकडून शाप दिला जातो. या शापानुसार कुटुंबातील कोणत्याही पुरुषाचं लग्न झाल्यानंतर त्याच्या पत्नीचा एका वर्षाच्या आत रहस्यमय परिस्थितीत मृत्यू होतो. हा शाप खरा ठरत जातो आणि त्यातून चित्रपटाची कथा पुढे सरकते.
या चित्रपटात बिस्वजीत यांनी ठाकूर प्रभात तर आशा पारेख यांनी संध्या गुप्ता यांची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत मेहमूद, निआशी, पद्मा चव्हाण आणि देव किशन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.
लता मंगेशकरांच्या आवाजाने गाणं लोकप्रिय
या चित्रपटातील ‘खुशी भी मिली हमको’ हे गाणं विशेष लोकप्रिय ठरलं. गाण्यात प्रेमापासून दुरावण्याची वेदना आणि मनातील हुरहूर अत्यंत प्रभावीपणे व्यक्त होते. त्यामुळे आजही हे गाणं ऐकल्यावर त्या काळातील भावविश्व डोळ्यांसमोर उभं राहतं.
या गाण्याचे शब्द प्रसिद्ध गीतकार शकील बदायुनी यांनी लिहिले होते तर संगीत हेमंत कुमार यांनी दिलं होतं. लता मंगेशकर यांच्या भावपूर्ण आवाजाने या गाण्यातील वेदना आणि तडफड आणखी प्रभावी झाली.
‘रात खामोशी से आती है चली जाती है, जिंदगी दर्द के सांचे में ढल जाती है…’ या ओळी ऐकताना गाण्यातील विरह आणि उदासी मनाला स्पर्शून जाते. लता मंगेशकरांच्या आवाजातील भावनिक चढ-उतारांमुळे हे गाणं आजही तितकंच जिवंत वाटतं.
