Tukaram Mundhe: आवडती हिरोइन कोण? मित्राचं रडणं अन् अभिनेत्रीचं लग्न.. तुकाराम मुंढेंनी सांगितला भन्नाट किस्सा
Tukaram Mundhe's Favorite Actress: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. तुमची आवडती हिरोइन कोण, या प्रश्नाचंही उत्तर त्यांनी दिलं आहे.

Tukaram Mundhe Favorite Actress: राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आणि फायरब्रँड अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या धडक कारवायांमुळे तुफान चर्चेत आहेत. भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, स्वच्छता आणि नियमांचं पालन न करणारे रेस्टॉरंट, हॉटेल्स यांवर त्यांनी थेट कारवाई केली आहे. या कारवायांमुळे ते खऱ्या आयुष्यातील ‘सिंघम’ किंवा ‘हिरो’ म्हणून ओळखले जात आहेत. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी नुकतीच त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ते विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी आवडती अभिनेत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या मित्राचा भन्नाट किस्सा सांगितला.
तुकाराम मुंढेंनी सांगितला मित्राचा किस्सा
तुकाराम मुंढे म्हणाले, “1998-99 चं ते वर्ष असेल. मी मेन्सचा अभ्यास करत होतो आणि पॅरासाइट म्हणून राहत होतो. तेव्हा प्रत्येकाच्या अभ्यासाचं ठिकाण ठरलेलं असायचं. माझ्या एका मित्राचा हा किस्सा आहे. त्याचं नाव घेऊ की नको, हासुद्धा एक प्रश्नच आहे, कारण वहिनींनी ऐकलं तर समस्या होईल. तो मित्र आता कस्टममध्ये आयुक्त आहे. आम्ही दोघं रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचो. एकेदिवशी रात्री दहा-साडेदहा वाजताच्या सुमारास तो रुममध्ये आला. त्याने माझ्या गळ्यात हात घातला आणि रडू लागला. हे पाहून मला धक्काच बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं की नाही, ते माहीत नाही. पण तो हुंदक्यांचा आवाज काढत होता. मी त्याला विचारलं काय झालं? मला भीतीच वाटत होती. कारण मी अभ्यासात मग्न असताना तो अचानक असा येऊन रडू लागला होता.”
मित्राचं रडणं अन् अभिनेत्रीचं लग्न
“मग त्याने मला विचारलं की पेपर वाचलास का? मी वाचलं तर मला त्यात विशेष काही दिसलं नाही. त्याला मी पुन्हा विचारलं की काय झालं? का रडतोय? तेव्हा तो म्हणाला, अरे माधुरीचं लग्न झालं. माधुरी दीक्षितचं.. हे ऐकून मी चकीतच झालो. आमच्या असेही किस्से घडले आहेत. आता मला कोण आवडत होतं, हे सांगायची डेरिंग मी करणार नाही. माझ्या संसार अगदी व्यवस्थित सुरू आहे” असं सांगत ते हसू लागतात. हे ऐकून उपस्थितांमध्येही एकच हशा पिकतो.
