Akshay Kumar | ट्विंकलशी लग्न करण्यापूर्वी सासू डिंपल कपाडिया यांनी अक्षयसमोर ठेवली होती ‘ही’ मोठी अट
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकल खन्ना तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नापूर्वी आई डिंपल कपाडियाने अक्षय कुमारसमोर मोठी अट ठेवल्याचा खुलासा तिने या मुलाखतीत केला. ही अट नेमकी कोणती होती, ते जाणून घेऊयात..
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची लव्ह स्टोरी अनेकांनाच माहीत असेल. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकलने तिच्या लग्नाबाबत नवा खुलासा केला. ट्विंकलची आई डिंपल कपाडिया आणि वडील राजेश खन्ना हे घटस्फोट न घेता बरीच वर्षे वेगळे राहिले. आईच्याच छत्रछायेत लहानाची मोठी झालेल्या ट्विंकलसाठी डिंपल कपाडिया फार प्रोटेक्टिव्ह होत्या. म्हणूनच जेव्हा अक्षय कुमारने डिंपल यांच्यासमोर ट्विंकलशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांनी आधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दोघांना दिला. लग्नापूर्वी दोघांनी दोन वर्षे लिव्ह-इनमध्ये राहावं आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, असं त्यांचं मत होतं.
डिंपल कपाडिया यांची अट
‘ट्विक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने ट्विंकलसोबत हजेरी लावली होती. यावेळी मसाबाने सांगितलं की तिच्या पूर्व पतीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास आई नीना गुप्ता यांचा विरोध होता. त्यावर ट्विंकलने तिच्या आईचं मत अगदी विरोधात होतं, असं सांगितलं. ती म्हणाली, “जेव्हा माझ्या पतीने सांगितलं की त्याला माझ्यासोबत लग्न करायचं आहे, तेव्हा माझी आई त्याला म्हणाली, तुम्ही दोन वर्षे एकत्र राहून पहा. जर त्यानंतरही तुम्हाला लग्न करावंसं वाटलं तर निर्णय घ्या.”
View this post on Instagram
वडील राजेश खन्ना यांच्याबद्दल ट्विंकल व्यक्त
“मी लग्न केलं आहे आणि लग्नाचा अनुभव कसा असतो हे मला नीट ठाऊक आहे, असं आईचं म्हणणं होतं”, असं ट्विंकल पुढे म्हणाली. जर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया एकत्र राहत असते, तर आपलं आयुष्यही थोडं वेगळं असतं, असंही तिने बोलून दाखवलं. “जर माझे आई-वडील सोबत राहत असते तर मी सतत काम करत राहिले असतो का, असा मला कधीकधी प्रश्न पडतो. कदाचित केलं नसतं. मला माझ्या आईनेच लहानाचं मोठं केलं. त्यामुळे बरीच वर्षे मला पुरुषप्रधान सिस्टिम काय असते याविषयी काहीच माहीत नव्हतं. कारण मी स्वत: पुरुषप्रधान कुटुंबात नव्हते”, असंही ट्विंकल म्हणाली.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाने 2001 मध्ये लग्नगाठ बांधली. अक्षय आणि ट्विंकलची जोडी ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेकदा ही जोडी विविध कारणांमुळे चर्चेत आली.