Bal Karve Death: ‘गुंड्याभाऊ’ काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन
Bal Karve Passed Away: तीन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचा 95वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आज, त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
अगदी तीन दिवसांपूर्वी बाळ कर्वे यांचा 95वा वाढदिवस साजरा केला होता. 1979 साली दूरदर्शन प्रसारित झालेल्या चिमणराव गुंड्याभाऊ ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेतील त्यांची गुंड्याभाऊची त्यांची भूमिका अजरामर ठरली. खरं तर या मालिकेने त्यांना ओळख मिळवून दिली होती. बन्या बापू या चित्रपटामधली त्यांची बापूची भूमिका त्यांची विशेष गाजली. राज्यसरकाराच्या पुरस्कारने देखील त्यांना सन्मानीत करण्यात आले होते.
इंजिनअर ते अभिनेता प्रवास
बाळ कर्वे हे पेशाने इंजिनिअर होते. पण अभिनयात रस असल्यामुळे त्यांनी अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’ होते. पण सर्वजण त्यांना बाळ या नावानेच आवाज देत. पुढे जाऊन याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. रंगकर्मी विजया मेहता हे त्यांचे नाट्यक्षेत्रातील गुरू होते. चिमणराव ही भारतीय टेलिव्हिजनची पहिली मालिका होती. त्यात त्यांनी गुंड्याभाऊंची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी ‘स्वामी’ या मालिकेत काम केले. या मालिकेतील त्यांची गंगोबा तात्या ही भूमिका देखील विशेष गाजली होती.
बाळ कर्वे यांची अभिनय कारकीर्द
बाळ कर्वे यांनी आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. उंच माझा झोका, प्रपंच, महाश्वेता, राधा ही बावरी, वहिनीसाहेब यासारख्या मालिकांमधील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. तसेच बन्याबापू (1978),लपंडाव ( 1993), गोडी गुलाबी ( 1991 ), चातक चांदणी ( 1992 ) हे त्यांचे गाजलेले सिनेमे होते. अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होते,कुसुम मनोहर लेले,मनोमनी, रथचक्र, लोभ नसावा ही विनंती,सूर्याची पिल्ले, शांतता कोर्ट चालू आहे या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.
