Pankaj Udhas | मोठी अपडेट ! पंकज उधास यांना काय झालं होतं?, 10 दिवसांपूर्वी का ॲडमिट करावं लागलं?
देशातल्या लाखो दर्दींच्या हृदयात कळ उमटणारी एक बातमी काल आली. प्रसिद्ध गझल गायक, पंकज उधास यांचं निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, अशी माहिती समोर आली आहे

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : देशातल्या लाखो दर्दींच्या हृदयात कळ उमटणारी एक बातमी काल आली. प्रसिद्ध गझल गायक, पंकज उधास यांचं निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या मुलीने यासंदर्भात माहिती दिली. सोमवारी संध्याकाळी पंकज उधास यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. मात्र 72 वर्षीय हे गायक गेल्या काही दिवसांपासून आजारीच होते अशी माहिती समोर आली आहे.
10 दिवसांपूर्वी पंकज उधास यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार पंकज उदास यांचे सोमवारी सकाीच निधन झाले, पण त्यांच्या कुटुंबियांनी संध्याकाळच्या सुमारास ही बातमी जाहीर केली. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिठ्ठी आयी है मुळे घराघरांत पोहोचले
नाम, साजन, मोहरा यासह अनेक चित्रपटांसाठी पंकज उधास यांनी पार्श्वगायन केले. चिठ्ठी आयी हे.. या गाण्यामुळे ते घराघरांत पोहोचले. तर ‘साजन’ चित्रपटातील ‘जिए तो जिएं कैसे’ हे गाणंही खूप हिट ठरलं. त्यांचं ‘चांदी जैसा रंग है तेरा’ हे गाणं श्रोत्यांच्या काळजाला हात घालतं. त्यांनी गायलेली ही गझल प्रचंड प्रसिद्ध झाली.
पंकज यांची ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ ही गझल लोकांनी खूप डोक्यावर घेतली. अगदी हायवेवर धावणाऱ्या ट्रकपासून ते ऑटो रिक्षामध्ये अनेकदा ही गझल ऐकायला मिळते. ‘और आहिस्ता कीजिए बातें’ हे त्यांचं गाणंही रसिकांच्या नक्कीच स्मरणात असेल. समीरा रेड्डीने त्यातून पदार्पण केलं होतं.
