तेव्हा उडी मारून जीव द्यायचा विचार केला पण..; विकी कौशलच्या वडिलांचा खुलासा
विकी कौशलच्या वडिलांना काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्याम कौशल यांनी कॅन्सरविरोधातील संघर्षाचा खुलासा केला.

अभिनेता विकी कौशलचे वडील श्याम कौशल हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध ॲक्शन डायरेक्टर आहेत. 2003 मध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. इतकंच नव्हे तर त्यांची जगण्याची शक्यता खूप कमी असल्याचंही डॉक्टर म्हणाले होते. हे ऐकल्यानंतर श्याम कौशल यांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. तेव्हा हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचाही विचार त्यांनी केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयीचा खुलासा केला. 2003 मध्ये त्यांच्यावर एक सर्जरी करण्यात येणार होती. त्यावेळी त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यावेळी हॉस्पिटल रुममध्ये जे-जे उपस्थित होते, ते सर्वजण खूप चिंतेत दिसत होते आणि डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की मी वाचू शकत नाही, असं ते म्हणाले.
अमन औजलाला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत श्याम यांनी सांगितलं, “त्यांनी मला संध्याकाळी सांगितलं होतं की मला कॅन्सर झालंय. त्यानंतर रात्री मी त्या हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार करत होतो. मी खचलो होतो म्हणून माझ्या डोक्यात तो विचार आला नव्हता, तर असंही मरायचंच आहे, मग आता का नको, असा प्रश्न माझ्या मनात आला होता. परंतु सर्जरीनंतरच्या वेदनांमुळे मी बेडवरून उठू शकत नव्हतो. आतापर्यंत मी माझं आयुष्य खूप चांगलं जगलो, त्यामुळे मला आताच्या आता घेऊन जा, अशी प्रार्थना मी देवाकडे करत होतो. परंतु त्या घटनेनंतर मला कधीच मरणाची भीती वाटली नाही.”
View this post on Instagram
“स्वत:शीच संवाद साधल्यानंतर मी मरणाच्या भीतीतून सावरलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यात नवी आशा निर्माण झाली. काही सर्जरीनंतर मी ठीक होईन, असं मला वाटलं. त्या घटनेनंतर आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला. मी माझी इच्छाशक्ती अधिक प्रबळ केली. त्यानंतर पुढच्या वर्षभरात त्यांनी माझ्या बऱ्याच चाचण्या आणि सर्जरी केल्या. सुदैवाने कॅन्सर माझ्या शरीरात परसला नव्हता. मी खंबीर राहिलो. मी देवाकडे पुढची दहा वर्षे मागितली होती आणि आता 22 वर्षे झाली आहेत. आयुष्यातील त्या टप्प्याने सर्वकाही बदललं होतं”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
1990 मध्ये ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम करण्याआधी श्याम कौशल हे बरीच वर्षे स्टंटमॅन होते. जवळपास चार दशकांपासून ते या इंडस्ट्रीत काम करत आहेत. ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘भार मिल्खा भाग’, ‘पीके’, ‘पद्मावत’, ‘संजू’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘सिम्बा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम केलंय. श्याम कौशल यांची दोन्ही मुलं बॉलिवूडमध्ये अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत.
