‘छावा’चा वाद राज ठाकरेंच्या दरबारी; दिग्दर्शक मनसे अध्यक्षांच्या भेटीला
'छावा' या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या चित्रपटावरून सध्या वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर ते 'शिवतीर्थ'वर दाखल झाले आहेत. हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘छावा’ या चित्रपटाचा वाद आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी गेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर हेसुद्धा ‘शिवतीर्थ’वर दाखल झाले आहेत. ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातील एका दृश्यात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल लेझीम खेळताना दिसून आला. हा सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काहींनी त्यावरून आक्षेप घेतला. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांनंतर त्यावरून राजकीय नेत्यांनीही टीका केली. लेझीमचा हा सीन हटवल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली. त्यानंतर आता दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले आहेत.
‘छावा’ या चित्रपटातील लेझीमच्या दृश्यावरून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एक गट समर्थन करत म्हणतोय की, लेझीमचं दृश्य अजिबात आक्षेपार्ह वाटत नाही. महाराजांची किर्ती सर्वत्र चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचत असेल तर त्यात आक्षेप का घ्यावा, असं काहीजण म्हणतायत. तर दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला अशा पद्धतीने लेझीम खेळताना दाखवू नये, अशी भूमिका दुसऱ्या गटाने घेतली आहे. अशातच चित्रपटातील हा वादग्रस्त भाग हटवल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
आता राज ठाकरेंच्या भेटीदरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर त्यांची काय बाजू मांडतात आणि मनसेकडून कोणती भूमिका घेण्यात येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘छावा’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका आहेत. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई भोसलेंच्या आणि अक्षय खन्ना हा औरंगजेबच्या भूमिकेत आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
“आपण आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट पाहिले आहेत. मात्र छत्रपती संभाजी महाराज हेसुद्धा मोठे योद्धा होते. मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे”, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शकांनी दिली होती. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे.
