मारहाण, शारिरक छळ, अत्यंत क्रूर वागणूक..; सेलिना जेटलीचे पतीवर गंभीर आरोप, कोण आहे पीटर हाग?
अभिनेत्री सेलिना जेटलीने तिच्या पतीविरोधात घरगुती हिंसाचार आणि शारीरिक छळ असे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर तिने पीटर हागविरोधात खटलासुद्धा दाखल केला आहे. 2011 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. त्यांना तीन मुलं आहेत.

अभिनेत्री सेलिना जेटलीने पती पीटर हागच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तिने पतीवर क्रूरता, छेडछाड आणि शारीरिक शोषण यांसारखे गंभीर आरोप केले आहेत. सेलिनाने घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत पतीविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील एका न्यायालयाने या प्रकरणात तिचा पती पीटर हाग याला नोटीस बजावली आहे. सेलिनाने 2011 मध्ये पीटरशी लग्न केलं होतं. या दोघांना तीन मुलं आहेत. पतीच्या अत्याचारामुळे ऑस्ट्रेलियातील घर सोडून भारतात परतावं लागल्याचा खुलासा सेलिनाने तिच्या याचिकेत केला आहे.
कोण आहे सेलिनाचा पती?
पीटर हाग हा ऑस्ट्रियातील हॉटेल व्यावसायिक, मार्केटर आणि ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट आहे. त्याने दुबई आणि सिंगापूरमधील अनेक हॉटेल चेन्ससाठी काम केलं आहे. त्याचा व्यवसाय युएई आणि आग्नेय आशियामध्ये पसरलं आहे. सेलिनाशी लग्न करण्यापूर्वी पीटर दुबईच्या एमार हॉस्पिटॅलिटी ग्रुपसह अनेक प्रमुख हॉटेल चेनमध्ये सीनिअर मार्केटिंग आणि व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्याने दुबई आणि सिंगापूरमधील लक्झरी हॉटेल चेनमध्येही वरिष्ठ पदांवर काम केलं आहे. पीटर सोशल मीडियावर फार कमी सक्रिय असतो. त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे, पण त्याचे कोणी फॉलोअर्स किंवा पोस्टही नाहीत.
View this post on Instagram
स्टार्स अनफोल्डेडच्या मते, सेलिनाचा पती पीटर हागची एकूण संपत्ती 14 अब्ज युरोपेक्षा जास्त आहे. सेलिना आणि पीटरची पहिली भेट दुबईतील एका कार्यक्रमात झाली होती. या पहिल्याच भेटीत सेलिना पीटरच्या प्रेमात पडली होती. परंतु त्यावेळी ते एकमेकांशी फार बोलले नाहीत. नंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि कुटुंबीयांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला. लग्नानंतर सेलिना आणि पीटर 2012 मध्ये जुळ्या मुलांचे पालक झाले. 2017 मध्ये तिने पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला. परंतु त्यापैकी एकाचे प्राण वाचू शकले नव्हते. सेलिना आणि पीटरला आता तीन मुलं आहेत.
“सेलिनाने खूप त्रास सहन केला आहे. कायदेशीररित्या क्रूरता मानल्या जाणाऱ्या गोष्टींना तिला सामोरं जावं लागलं आहे. शारीरिक हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. पीटर हागचा राग अनावर झाला की तो वस्तू फेकायचा, फोडायचा, तोडफोड करायचा. कधीकधी सेलिनाशी हिंसक पद्धतीने वागायचा,” असा खुलासा सेलिनाच्या वकिलांनी केला आहे.
