क्रिकेटशी संबंध नाही, तरी या अभिनेत्रीच्या लग्नाला पोहोचले युवराज, सेहवाग, नेहरा, झहीर खान..
या अभिनेत्रीने मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर मित्रपरिवारासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला युवराज सिंग, झहीर खान, वीरेंद्र सेहवाग हे माजी क्रिकेटर्स उपस्थित होते.

बुधवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर माजी क्रिकेटर युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. हे सर्वजण एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लग्नानंतरच्या पार्टीत सहभागी झाले होते. एका व्हिडीओमध्ये हे सर्वजण आनंदाने नाचताना दिसत आहेत. आता या अभिनेत्रीच्या लग्नाच्या पार्टीत इतके माजी क्रिकेटर्स का उपस्थित होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर आहे तिचा पती. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री क्रितिका कामराने स्पोर्ट्स प्रेझेंटर, सूत्रसंचालक गौरव कपूरशी लग्न केलं आहे. मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं आणि त्यानंतर मित्रपरिवारासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं.
क्रितिका आणि गौरवच्या या पार्टीला युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल कीच त्यांच्या मुलांसोबत उपस्थित होते. त्याचसोबत आशिष नेहरा, वीरेंद्र सेहवाग, नेहा धुपिया आणि अंगद बेदी, अमृता अरोरा आणि शकील लडाक, मलायका अरोरा, झहीर खान, फरहान अख्तर आणि सागरिका घाटगे हे सेलिब्रिटीसुद्धा दोघांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
View this post on Instagram
‘कितनी मोहब्बत हैं’ या मालिकेतून क्रितिका प्रकाशझोतात आली होती. यामध्ये तिने अभिनेता करण कुंद्रासोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनसुद्धा हिट होती. इतकंच नव्हे तर या मालिकेत एकत्र काम करता करता दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. परंतु या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं. त्यानंतर आता क्रितिकाने गौरव कपूरशी लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
क्रितिकाने ‘कितनी मोहब्बत है’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘रिपोर्टर्स’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय तिने ‘भीड’, ‘तांडव’, ‘मित्रों’, ‘बंबई मेरी जान’ यांसारख्या प्रोजेक्ट्सद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम केलंय. तर दुसरीकडे गौरव कपूर हा प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट (सूत्रसंचालक) आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ हा त्याचा युट्यूबवरील टॉक शो लोकप्रिय आहे.
