दररोज केवळ १० मिनिटे करा ही योगासनं; गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेपासून मिळवा आराम
गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रोज करा ही २ सोपी योगासनं. केवळ १० मिनिटांत पचनक्रिया सुधारण्यास आणि पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

बदलती जीवनशैली, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि सतत बसून काम करण्याची सवय यामुळे पचनाशी संबंधित समस्या वाढताना दिसतात. गॅस, पोट फुगणे, अपचन आणि बद्धकोष्ठता यामुळे अनेकांना दिवसभर अस्वस्थ वाटू शकते. अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळेही या समस्या जाणवतात. अशावेळी आहारात आवश्यक बदल करण्यासोबतच नियमित शारीरिक हालचाल करणे महत्त्वाचे ठरते. योगासने हा त्यासाठी एक सोपा पर्याय ठरू शकतो. रोजच्या व्यस्त दिनचर्येतून केवळ १० मिनिटे काढून काही सोपी योगासने केल्यास पचनाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळण्यास मदत होऊ शकते. यामध्ये पवनमुक्तासन आणि बद्ध कोणासन ही दोन सोपी आसने करता येतात. ही आसने शरीरावर जास्त ताण न देता योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा.
पवनमुक्तासन
पवनमुक्तासनाला ‘विंड रिलिव्हिंग पोज’ असेही म्हटले जाते. पोटावर हलका दबाव निर्माण होत असल्याने पोटातील अडकलेले गॅस बाहेर जाण्यास हे आसन मदत करू शकते. तसेच बाऊल मूव्हमेंट सुधारण्यास आणि पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास देखील हे आसन सहाय्यक ठरू शकते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पाय सरळ ठेवून हात शरीराच्या बाजूला ठेवा. त्यानंतर श्वास सोडताना दोन्ही गुडघे वाकवून छातीजवळ आणा. गुडघे छातीला लावण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर डोके आणि मान हलके वर उचलून हनुवटी गुडघ्यांच्या दिशेने आणा. काही क्षण या स्थितीत राहिल्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीत या. आसन करताना श्वास रोखू नका आणि शरीरावर किंवा गुडघ्यांवर जास्त दबाव देणे टाळा.
बद्धकोणासन
बद्धकोणासनाला बटरफ्लाय पोझ किंवा तितली आसन असेही म्हटले जाते. हे सोपे आसन असून पचनाशी संबंधित समस्यांमध्ये मदत करू शकते. या आसनामुळे पोटातील गॅस बाहेर जाण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास आणि पेल्विक भागातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते. अपचन आणि पोटातील कळा कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरू शकते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सुखासनात बसा. त्यानंतर दोन्ही पाय आतल्या बाजूला वाकवून तळवे एकमेकांना चिकटवा आणि टाचा शरीराच्या जवळ आणा. पाठ ताठ ठेवून दोन्ही गुडघे हळूहळू वर-खाली करा. श्वासाच्या लयीत ही हालचाल करत हे आसन १० ते १५ वेळा करता येते. आसन करताना हालचाल संथ आणि आरामदायी ठेवणे आवश्यक आहे.
