वायू प्रदूषणामुळे हार्ट आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका, दिल्ली NCRच्या प्रदूषणाबाबत तज्ज्ञांनी दिला इशारा
दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषणामुळे श्वास घेणंदेखील कठीण झालं आहे. वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी सरकारपासून प्रशासनापर्यंत पावले उचलली जात आहेत. पण, परिस्थिती नियंत्रणाबाहेरच जात आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी आधीच आजारी असलेल्या लोकांना प्रदूषणाबाबत सतर्क केले आहे.
नवी दिल्ली | 7 नोव्हेंबर 2023 : दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणामुळे (air pollution) प्रत्येकजण त्रस्त आहे. विषारी धुकं आणि धूर यामुळे साधं श्वास घेणंही अतिशय कठीण झालं आहे. अशातच विविध आजार डोकं वर काढत असून रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. दरम्यान, डॉक्टरही स्मॉगबाबत सतर्कता व्यक्त करत आहेत. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, संशोधनातून असे दिसून आले आहे की वायू प्रदूषणाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही तर हृदय आणि मेंदूवरही होतो. मेडिकल रिसर्चनुसार, वायुप्रदूषणाच्या परिणामामुळे हार्ट आणि ब्रेन स्ट्रोक येण्याचे प्रमाणाही वाढले आहे. हे टाळण्यासाठी कार्यक्षम एअर प्युरिफायर आणि मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यांच्या सांगण्यानुसार, सर्वात जास्त मृत्यू हे हार्ट ॲटॅक किंवा स्ट्रोकमुळे होतात. प्रदूषण हे कणांच्या रूपाने आपल्या शरीरात प्रवेश करते. ते कण रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे अस्तर खराब होते. ब्लड प्रेशर आणि ब्लॉकेज वाढते. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. आधीच आजारी असलेल्या लोकांना प्रदूषणाचा धोका जास्त असतो.
वायू प्रदूषणामुळे शरीरावर विपरीत परिणाम
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, 2015 मध्ये डब्ल्यूएचओने सांगितले होते की सुमारे 20 टक्के स्ट्रोकच्या घटना घडत आहेत. सुमारे 20 ते 25 टक्के लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. प्रदूषण हे देखील याला कारणीभूत ठरते आहे. वायू प्रदूषणाकडे आपण अजूनही दुर्लक्ष करत आहोत. PM 2.5 चे फक्त 10 मायक्रोग्राम वाढल्याने स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका 10 टक्क्यांनी वाढतो. अलीकडे AQI 700 च्या वर जात आहे. याचा शरीरावर खूप परिणाम होतो. प्रदूषणाचा प्रभाव घरामध्येही दिसून येतो. ज्यांना आधीच जास्त धोका आहे त्यांनी चांगल्या दर्जाचे एअर प्युरिफायर वापरावे. घर बंद ठेवले पाहिजे.
‘N-95 मास्क लावा’
N-95 मास्क वापरत राहा. घरांची दारं, खिडक्या पूर्णपणे बंद ठेवावीत. थोड्या वेळासाठीही दार उघडल्याने प्रदूषणाचा परिणाम होतो. एअर प्युरिफायर देखील मजबूत असावे. त्याचा प्रभाव काही तासच टिकू शकतो.
दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणामुळे लोकांच्या डोळ्यात जळजळ, छातीत जळजळ, घसादुखी अशा तक्रारी येत आहेत. विषारी धुक्यामुळे लोकांना श्वास घेणेही अतिशय कठीण झालं आहे. धूळ कमी व्हावी आणि वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) सुधारेल, यासाठी टँकरद्वारे रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे. पण या व्यवस्थादेखील प्रभावी ठरताना दिसत नाहीत.