हृदयासाठी गुणकारी डाळिंब; 80% पर्यंत सुधारू शकतं कार्य, अभ्यासात महत्त्वाचा दावा
डाळिंब हे चविष्ट आणि पोषक फळ म्हणून ओळखले जाते, पण त्याचा हृदयाच्या आरोग्याशीही संबंध असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. डाळिंबातून शरीरात तयार होणाऱ्या एका घटकामुळे हृदयाच्या कार्यात ८० टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आल्याचे संशोधनात आढळले आहे.

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबही याच कारणामुळे आरोग्यदायी फळांमध्ये गणले जाते. आता एका संशोधनात डाळिंबासह काही फळांमध्ये आढळणाऱ्या घटकामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटकाचे नाव ‘युरोलिथिन ए’ असून, त्याच्या परिणामांबाबत संशोधकांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.
किंग्स कॉलेज लंडनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात हृदयाच्या एका विशिष्ट समस्येचा अभ्यास करण्यात आला. या स्थितीत हृदय रक्त पंप करत असले तरी प्रत्येक ठोक्यानंतर ते पुरेसे सैल होत नाही, त्यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. संशोधना दरम्यान युरोलिथिन एच्या वापरामुळे हृदयाच्या कार्यात ८० टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली. मात्र, हा निष्कर्ष सध्या प्राण्यांवरील प्रयोगातून समोर आला असून, मानवांमध्ये त्याचा परिणाम निश्चित करण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे.
हृदयात नेमकी समस्या काय होते?
हृदय प्रत्येक ठोक्यानंतर काही काळ सैल होऊन त्यात पुन्हा रक्त भरून घेते. मात्र, काही प्रकारच्या हृदयविकारांमध्ये हृदयाच्या स्नायूंमध्ये कडकपणा निर्माण होतो आणि ते व्यवस्थित सैल होऊ शकत नाहीत. त्यामुळे हृदयात पुरेसे रक्त भरले जात नाही. अशा स्थितीत थकवा जाणवणे, धाप लागणे आणि सामान्य काम किंवा व्यायाम करताना त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
युरोलिथिन ए कसं काम करतं?
किंग्स कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी याच समस्येचा अभ्यास करत युरोलिथिन एवर प्रयोग केला. संशोधकांच्या माहितीनुसार, डाळिंब, अक्रोड आणि काही बेरीज यांसारखे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात हा घटक तयार होऊ शकतो. हा घटक हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या एका विशिष्ट प्रथिनाला सक्रिय करतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना योग्य प्रकारे सैल होण्यास मदत होऊ शकते.
८० टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसली
प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात युरोलिथिन एच्या वापरानंतर हृदयाच्या कार्याशी संबंधित काही मोजमापांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली. याशिवाय हृदयाच्या ऊतींमध्ये तयार होणारे नुकसानकारक व्रण कमी झाल्याचे आणि हृदयाच्या स्नायूंची अतिरिक्त वाढ कमी झाल्याचेही आढळले.
मानवी उपचारांसाठी अजून संशोधन आवश्यक
संशोधकांनी प्रयोगशाळेत मानवी पेशींपासून तयार केलेल्या हृदयाच्या ऊतींवरही युरोलिथिन एचा प्रयोग केला. त्यातही हृदयाच्या ऊतींना अधिक चांगल्या पद्धतीने सैल होण्यास मदत झाल्याचे दिसले. त्यामुळे भविष्यात या घटकाच्या मदतीने हृदयविकारांवरील उपचारांवर संशोधन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, युरोलिथिन ए हा सध्या हृदयविकारावरील उपचार असल्याचे म्हणता येणार नाही. त्यासाठी मानवांवर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ डाळिंब खाल्ल्याने हृदयविकार बरा होईल, असा निष्कर्ष या संशोधनातून काढता येत नाही.
