धक्कादायक, “पेशंट वाचवायचाय? मग व्हेंटिलेटरसाठी दीड लाख द्या”, सांगलीतील रुग्णालयात दलालांचा सुळसुळाट, रुग्णांचे गंभीर आरोप

दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरु आहे. असाच एक धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या प्रकाश रुग्णालयात होत असल्याचा आरोप झालाय.

धक्कादायक, पेशंट वाचवायचाय? मग व्हेंटिलेटरसाठी दीड लाख द्या, सांगलीतील रुग्णालयात दलालांचा सुळसुळाट, रुग्णांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 8:53 PM

सांगली : कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडली आहे. असं असताना याही काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरु आहे. असाच एक धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या प्रकाश रुग्णालयात होत असल्याचा आरोप झालाय. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी ओळख उघड न करण्याच्या अटीवर या गैरप्रकाराबाबत माहिती दिलीय. ‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’ आणि ‘स्नेहबंध’ संस्थेने या प्रकाराचा पाठपुरावा करत व्हेंटिलेटर बेडसाठी दीड लाख रुपये मागणाऱ्या या दलालांचे फोन रेकॉर्डिंग देखील जारी केलेय. यात ते स्पष्टपणे व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून दीड लाखांची मागणी करत आहेत. इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार होत असल्याचं त्यांनी म्हटलंय (Special report on Commission for Ventilator bed in Prakash Hospital Islampur Sangli).

दलालांकडून व्हेंटिलेटर बेडसाठी तब्बल दीड लाख रुपयांची मागणी

प्रकाश रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांनीही व्हेंटिलेटर बेडसाठी दीड लाख रुपये दिल्याचं सांगितलंय. यानंतर सपोर्ट फॉर कोविड पेशंट आणि स्नेहबंध संस्थेने दलालांना फोन करुन याबाबत खातरजमा केली. तसेच त्यांचा फोन रेकॉर्ड केला. या सर्व घटनेच्या ऑडियो क्लिप्स टीव्ही 9 मराठीच्या टीमकडे उपलब्ध आहेत. कोरोना महामारीच्या काळात दलालांकडून तब्बल दीड लाख रुपये घेऊन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करुन दिला जात असल्याचा हा प्रकार उघड झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात खळबळ उडाली आहे.

“पेशंट तडफडून जीव सोडत असताना व्हेंटिलेटरसाठी दलाली गंभीर”

सपोर्ट फॉर कोविड पेशंटचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते किरण या प्रकरणावर बोलताना म्हणाले, “शनिवारी रात्रीपासून 3 पेशंटला व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी फोनाफोनी सुरू होती. एका सहकाऱ्याने आनंद जाधव यांचा नंबर दिला असता त्यांच्याकडून या दीड लाखांच्या प्रकरणाची माहिती मिळाली. हे ऐकून डोक्यातून एकदम सणक गेली. इथं पेशंट तडफडून जीव सोडत असताना व्हेंटिलेटरसाठी दलाली होत असल्याचा हा प्रकार गंभीर आहे. असं असेल तर गरिबांनी पैसे नाहीत म्हणून जगायचंच नाही का? या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी.”

‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचीच ही जमात’

“माझ्या ओळखतील एका बऱ्या झालेल्या पेशंटनी मला सांगितलं की इस्लामपूरच्या दवाखान्यात अॅडमिट करा. पैसे भरली की तिथे सोय होतेय. हा प्रकार नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी मी संबंधित व्यक्तीला फोन लावला असता ही धक्कादायक घटना समोर आली. मी काम करत असलेल्या ग्रुपमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणारे लोक आहेत. आपला पूर्ण दिवस खर्ची घालून ते एक एक बेड, प्लाझ्मा बॅग मिळवून देतायत. इथे केला जाणारा जीवाचा सौदा पाहून ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचीच’ ही जमात असल्याचं दिसून आलं. प्रशासनाने यावर तात्काळ पावलं उचलून हे गैरप्रकार थांबवावेत,” असं मत कोल्हापूरच्या नम्रता पाटील आणि साताऱ्याच्या मेघना देशमुख यांनी व्यक्त केलंय.

‘एकिकडे व्हेंटिलेटर बेडची कमतरता, दुसरीकडे दलाली’

मागील महिनाभरात राज्यातील सरकारी, खासगी दवाखाने रुग्णांनी खचून भरले आहेत. सरकारी दवाखान्यांमध्ये तर काही ठिकाणी एकाच बेडवर 2 ते 3 रुग्ण उपचार घेत असल्याचंही विदारक चित्र समोर आलंय. सांगलीसह आजूबाजूच्या 2 ते 3 जिल्ह्यांमध्येही दररोज व्हेंटिलेटरअभावी रुग्ण तडफडून जीव गमावत आहेत. असं असताना प्रकाश हॉस्पिटलमध्ये मात्र पैसे घेऊन बेड देण्याचा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.

हा दलाला कोण? स्वतः रुग्णांनीच दिली माहिती

सपोर्ट फॉर कोविड पेशंट आणि स्नेहबंध ग्रुपच्या सदस्यांनी प्रकाश रुग्णालयातून उपचार घेऊन बरे झालेल्या 2 नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यावेळी या रुग्णांच्या नातेवाईकांनी खालील घटनाक्रम नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितला. हे नातेवाईक सातारा जिल्ह्यातील आहेत. ते म्हणाले, “या प्रकरणात एजंट म्हणून काम करणारे आनंद जाधव हे साताऱ्यातील रहिवासी आहेत. त्यांचा रुग्णवाहिकेचा व्यवसाय आहे. मागे एक रुग्ण प्रकाश हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली आणि त्यानंतर हा प्रकार पुढे चालूच राहिला.”

व्हेंटिलेटरसाठी दीड लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दलालासोबतचा नेमकं काय बोलणं झालं?

पेशंटचे नातेवाईक : दादा, लई आशेनं फोन केलाय तुम्हाला, आमचा पेशंट लई सिरीयस हाय. तुमच्याकडं काही बेडची सोय होत असली तर बघा की. दुपारी 4 वाजल्यापासून समद्या जिल्ह्यात चकरा मारल्या, पण कुठं सुद्धा बेड मिळाला नाही.

एजंट (जाधव) : बरं, बघू काय होतंय ते. काय नाव म्हणाला पेशंटचं?

पेशंट माहिती देतात

एजंट : कुठून बोलताय? ऑक्सिजन लेवल कितीय? सध्या ऍडमिट आहे दवाखान्यात की घरीच आहेत?

पेशंट माहिती देतात

एजंट : CT स्कोअर कितीय सांगा बरं एकदा. अच्छा 15 आहे का, मग बरोबर व्हेंटिलेटर बेड लागणारच. एक काम करतो, बेड आहे का बघतो आणि 5 मिनिटांनी परत फोन करतो.

परत फोन येतो.

एजंट : एका बेडचं काम झालं आहे तुमचं. तुम्हाला कधी पाहिजे ते मला फिक्स सांगा फक्त. आणि हो एक गोष्ट आहे, तुम्हाला दवाखान्यात अॅडमिट होताना दीड लाख रुपये कॅश द्यावी लागेल बरं का.

पेशंटचे नातेवाईक : काय, एवढे पैसे?

एजंट : हो, सध्या एकच बेड शिल्लक असून त्यासाठी 4 जणांनी फोन केलाय. तुमचं कन्फर्म करायचं असेल तर सांगा तसं मी पुढं कळवतो. आणि हो हे दीड लाख भरल्यावर पावती बिवती काही मिळणार नाही. दवाखान्यात तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा मिळतील, अगदी रेमडिसिव्हरचीही अडचण येणार नाही. पण ते दीड लाखांचं काम करावंच लागेल. शिवाय रोजचा दवाखान्याचा खर्च साधारण 15 हजार रुपये होईल. पेशंट जितक्या दिवस अॅडमिट असेल तितके दिवस बिल वाढत जाईल.

संबंधित चर्चा ऐका :

दलालांची मोडस ऑपरेंडी काय?

या चर्चेनंतर पेशंटच्या नातेवाईकांना एक फोन नंबर दिला जातो आणि त्यावर पुढील बोलणं करायला लावलं जातं. दवाखान्यात गेल्यानंतर त्या डॉक्टरांच्या/व्यवस्थापनाच्या केबिनमध्ये प्रवेश करताना मोबाईल वगैरे बाजूला ठेवायला लावतात. पैशांच्या देवाण-घेवाणी बाबतचं बोलणंच फक्त या ठिकाणी करायचं असा नियम आहे. हे बोलणं रणधीर नावाच्या व्यक्तीशी होत असून त्यांच्या बोलण्याचे डिटेल्सही नातेवाईकांनी दिले आहेत.

“सामान्य रुग्णांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही, मात्र दलालांकडून उपलब्ध”

विशेष म्हणजे प्रकाश हॉस्पिटलमध्ये रेग्युलर पद्धतीने व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत का असं विचारलं. त्यानंतर त्यांनी प्रवीण माने आणि अक्षय पाटील या संबंधितांशी बोलणं करायला सांगितलं. त्यांच्याशी संपर्क केला असता दोघांनीही सध्या कुठेच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होऊ शकत नाही असं सांगितलं.

व्हेंटिलेटर बेडच्या या प्रकारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी

एकाच दवाखान्यात बेड उपलब्ध नाही असं सांगणं आणि दुसरीकडे एजंट लोकांतर्फे उपलब्ध असलेले बेड दीड लाख रुपयांना विकणं हा गंभीर प्रकार याठिकाणी उघडकीस आला आहे. या घटनेची दखल तातडीने घेण्याची मागणी सपोर्ट फॉर कोविड पेशंट आणि स्नेहबंध ग्रुपतर्फे ग्रुपतर्फे किरण तांबे, योगेश जगताप, नम्रता पाटील, रोहित मोहिते, मेघना देशमुख यांनी केली आहे.

रुग्णालयातील मॅनेजमेंट कोटा काय प्रकार आहे?

प्रकाश हॉस्पिटलमध्ये व्हीआयपी (VIP) आणि मॅनेजमेंट कोटा असून जास्त पैसे भरून इमर्जन्सी उपचार घ्यायचे असतील तर त्या कोट्यातून प्रवेश देतात असं आनंद जाधव यांनी सांगितलं. तुमच्याकडे पैसे नसतील तर अॅडजस्ट करा, कुठूनही करा पण पैसे भरल्याशिवाय व्हेंटिलेटर बेड मिळणार नाही हाच त्यांच्या बोलण्याचा रोख दिसून आला. दवाखान्या व्यतिरिक्त असणारे व्हेंटिलेटर बेड हे कंपनीने दिलेले असून त्याचं भाडं द्यावं लागतं म्हणून ते दीड लाख रुपये घेतात असा दावा संबंधित एजंट जाधव यांनी केलाय.

सरकारी नियमांची पायमल्ली करुन रुग्णांची लूट

कोविड काळात खासगी दवाखान्यांनी घ्यायच्या रकमेबद्दल शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. असं असताना पैसे घेऊन बेड विकण्याचा हा प्रकार राजरोसपणे चालू असल्याचा आरोप होतोय. जवळपास 200 पेक्षा अधिक रुग्ण या ठिकाणाहून सुखरूप बरे होऊन गेले आहे. त्या प्रत्येक पेशंटमागे लाखो रुपये कमावणाऱ्या या दलालांच्या साखळीला सरकार चाप लावणार का? हाच खरा प्रश्न आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि कोविड सपोर्ट ग्रुपने केली आहे.

आता याबाबत प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार? व्हीआयपी म्हणून शिल्लक ठेवलेले व्हेंटिलेटर बेड सामान्य नागरिकांसाठी वापरात येणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा :

केंद्राचा सावळागोंधळ, PM केअर फंडातून नाशिकला 60 व्हेंटिलेटर, पण कनेक्टरच नसल्यानं बंद

व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका मिळाली नाही, कोरोनामुळे NSG ग्रुप कमांडरचा मृत्यू

‘कोरोना लसच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरण वाटपातही महाराष्ट्रसोबत दुजाभाव’, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

व्हिडीओ पाहा :

Special report on Commission for Ventilator bed in Prakash Hospital Islampur Sangli

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.