World Hepatitis Day 2022: हिपॅटायटीस दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या, या दिवसाचे महत्त्व, इतिहास, थीम!
World Hepatitis Day History: जागतिक हिपॅटायटीस दिवस दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. या धोकादायक आजाराबाबत लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हिपॅटायटीस डेचे महत्त्व, इतिहास, थीम, कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धतीबाबत जाणून घ्या, अधिक माहिती.

World Hepatitis Day History: हिपॅटायटीस हा यकृताशी निगडीत आजार आहे. ज्यामध्ये यकृताला सूज (Inflammation of the liver)येते आणि त्यामुळे पेशींचे नुकसान होते. हिपॅटायटीस ही सामान्यतः विषाणूजन्य संसर्गामुळे (Due to viral infection) उद्भवणारी समस्या आहे. तथापि, जास्त प्रमाणात मद्यपान, विषारी पदार्थ, काही औषधे, दूषित अन्न आणि पाणी आणि काही वैद्यकीय परिस्थितींमुळे देखील हिपॅटायटीस होऊ शकते. या आजाराचे अनेक प्रकार आहेत जसे की A, B, C, D आणि E. परंतु हिपॅटायटीस B हा अत्यंत धोकादायक मानला जातो. हिपॅटायटीस बी (Hepatitis B) विषाणूमुळे यकृताला संसर्ग होतो. निष्काळजीपणामुळे यकृत खराब होऊन यकृताचा कर्करोग होण्याचाही धोका असतो. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व, इतिहास, थीम आणि इतर महत्वाची माहिती जाणून घ्या.
हिपॅटायटीस दिवसाचे महत्त्व
आकडेवारीनुसार, हिपॅटायटीसमुळे जगभरात दर 30 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. त्याचे पाच प्रकार आहेत आणि सर्वांचा लोकांवर वेगवेगळा प्रभाव पडतो. काळाच्या ओघात ही समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत लसीकरण, तपासणी आणि औषधांसोबतच लोकांना या आजाराबाबत जागरुकता आणण्यासाठी आणि त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या जनजागृती मोहिमेद्वारे सुमारे 4.5 दशलक्ष अकाली मृत्यू टाळता येतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.
हिपॅटायटीस दिवसाचा इतिहास
हिपॅटायटीस बी विषाणूचा शोध नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. बारुच ब्लमबर्ग यांनी लावला होता. हेप-बी विषाणूच्या उपचारासाठी डॉ. बारूच यांनी स्वतः चाचणी करून लस तयार केली होती. डॉ. बारुच ब्लमबर्ग यांचा जन्म २८ जुलै १९२५ रोजी झाला. हेपेटायटीस बी वरील संशोधनातील त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांचा सन्मान करण्यासाठी, 2008 मध्ये, प्रथमच, त्यांची जन्मतारीख 28 जुलै हा जागतिक हिपॅटायटीस दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो. या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जगभरातील लोकांना हिपॅटायटीसबद्दल जागरूक करण्यासाठी मोहीम राबविण्यात येते, जेणेकरून जगाला लवकरात लवकर हेपेटायटिसमुक्त करता येईल.
हिपॅटायटीस डे थीम
दरवर्षी हिपॅटायटीस दिनाची थीम निश्चित केली जाते. 2021 मधील जागतिक हिपॅटायटीस दिनाची थीम ‘हिपॅटायटीस प्रतीक्षा करू शकत नाही’ अशी होती. त्याचवेळी, 2022 मधील जागतिक हिपॅटायटीस दिनाची थीम ‘Bringing Hepatitis Care to closer to you’ ठेवण्यात आली आहे. हिपॅटायटीस सारख्या आजाराबद्दल लोकांनी आता जागरूक राहून स्वतःची काळजी घ्यावी, जेणेकरून 2030 पर्यंत या आजाराचा समूळ नाश करता येईल, हा या थीममागील हेतू आहे.
जाणून घ्या हिपॅटायटीसची कारणे
- जंतुसंसर्ग
- स्वयंप्रतिरोधक रोग
- दूषित अन्न
- काही औषधांचे दुष्परिणाम
- अति प्रमाणात मद्यपान
- यकृताचा संसर्ग
- शरीरावर टॅटू किंवा संक्रमित रक्त संक्रमणामुळे.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
हिपॅटायटीस दीर्घकाळ राहिल्यास काविळीचे रूप घेते. जसजसा त्याचा संसर्ग वाढत जातो तसतशी समस्या देखील गंभीर होऊ लागते. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हर सिरोसिस आणि यकृताचा कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळे त्याची लक्षणे विसरुनही दुर्लक्ष करता कामा नये. हिपॅटायटीसची लक्षणे आहेत- यकृताला सूज येणे, लघवीचा रंग गडद होणे, पोटात तीव्र वेदना होणे, भूक आणि तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, डोळे पिवळे होणे, ताप आणि उलट्या होणे आणि पोटात सूज येणे इ. पण वेळीच योग्य उपचार, आहार आणि जीवनशैली सुधारून तुम्ही हा आजार संपवू शकता.
