इराणचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर, घेतला मोठा निर्णय; बलाढ्य अमेरिकेला चीनपुढे पसरावे लागले हात
अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी १४ बंकर-बस्टर बॉम्ब, २ डझनहून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रे आणि १२५ हून अधिक लष्करी विमाने वापरून इराणच्या मुख्य अणुस्थळांना "उद्ध्वस्त" केले. त्यानंतर आता इराणने चोख प्रतित्तूर दिले आहे.

इराणने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मोठी किंमत चुकवण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, इराणने फारसच्या आखाताला अरबी समुद्राशी जोडणारा अरुंद जलमार्ग होर्मुझ (Strait of Hormuz) बंद करण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे जगातील अनेक देश दबावाखाली आले आहेत, ज्यात अमेरिकाही समाविष्ट आहे. यासाठी अमेरिकेने चीनकडे मदतीची विनंती केली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी रविवारी (22 जून 2025) चीनला आवाहन करताना सांगितले की, त्यांनी इराणला होर्मुझ जलमार्ग बंद न करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रविवारी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ले केल्याने इराण प्रचंड संतापला आहे. त्याने या क्षेत्रातील अमेरिकी नागरिकांना लक्ष्य करण्याची घोषणा केली आणि होर्मुझचा जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली.
होर्मुझच्या जलमार्गातून 20 टक्के तेल-वायूचा प्रवाह
फॉक्स न्यूजच्या “संडे मॉर्निंग फ्यूचर्स विद मारिया बार्टिरोमो” या कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री रुबियो यांचे हे वक्तव्य इराणच्या प्रेस टीव्हीच्या अहवालानंतर आले. या अहवालात म्हटले आहे की, इराणच्या संसदेने होर्मुझचा जलमार्ग बंद करण्यासंबंधीच्या उपायांना मंजुरी दिली आहे, ज्याद्वारे जागतिक तेल आणि वायूच्या सुमारे 20 टक्के प्रवाह होतो.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम करणारे मार्को रुबियो म्हणाले, “मी बीजिंगमधील चीनी सरकारला याबाबत इराणशी बोलण्यासाठी प्रोत्साहित करतो, कारण त्यांचे तेल होर्मुझच्या जलमार्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.”
त्यांनी पुढे म्हटले, “जर त्यांनी (इराणने) असे केले, तर ही त्यांची आणखी एक भयंकर चूक असेल. असे केल्यास त्यांच्यासाठी ही आर्थिक आत्महत्या (economic suicide) ठरेल आणि आमच्याकडे याचा सामना करण्याचे पर्याय आहेत. मात्र, इतर देशांनीही याचा विचार करावा. यामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थांचे आमच्या तुलनेत खूप मोठे नुकसान होईल.”
रुबियो म्हणाले की, जलमार्ग बंद करण्याचे पाऊल खूप मोठे असेल, ज्यासाठी अमेरिका आणि इतर देशांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरेल. मात्र, वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासाने या मुद्द्यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
इराणने कारवाई केल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल: अमेरिका
अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी 14 बंकर-बस्टर बॉम्ब, दोन डझनहून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रे आणि 125 हून अधिक लढाऊ विमानांचा वापर करून इराणच्या मुख्य अणुस्थळांचा “नाश” केला आहे. मात्र, अमेरिकेने केलेला हा हल्ला मध्य पूर्वेतील चालू संघर्षाला आणखी तीव्र करू शकतो. वॉशिंग्टनच्या या हल्ल्यानंतर तेहरानने स्वतःचा बचाव करण्याची शपथ घेतली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी रविवारी इराणच्या प्रत्युत्तर कारवाईविरोधात इशारा देताना सांगितले की, अशी कारवाई “त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी चूक असेल.” त्यांनी हेही म्हटले की, अमेरिका इराणशी चर्चा करण्यास तयार आहे.
