Donald Trump : जग हादरवाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का, अमेरिकेवर घोंगावतंय मोठं संकट…
अमेरिकेवर मोठं संकट घोंगावत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसू शकतो. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्समधील बजेटवरून वाद वाढत असल्याने लाखो कामगारांचं भविष्य धोक्यात आहेत. शिक्षण विभाग आणि अनेक एजन्सींवर परिणाम होऊ शकतो. नक्की काय घडतंय?

जागतिक महासत्ता म्हणत संपूर्ण जगाला हादरवणारे निर्णय घेणाऱ्या अमेरिकेवरच मोठं संकट घोंगावत असून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसू शकतो. अतिरिक्त टॅरिफ, त्यानंतर H-1B व्हिसा शुल्कातील वाढीचा बॉम्ब टाकणारे डोनाल्ड ट्रम्प हेच आता मोठ्या अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. त्याचं कारण म्हणजे अमेरिका पुन्हा एकदा सरकारी शटडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला सिनेटमध्ये तात्पुरत्या निधी विधेयक मंजूर करण्यासाठी किमान 60 मतांची आवश्यकता होती, परंतु त्यांना फक्त 55 मतं मिळाली. म्हणजेच हा प्रस्ताव नाकारला गेला आहे. सरकारकडे आता आवश्यक निधी विस्तार नाही, याचा अर्थ अनेक संघीय कार्ये थांबवली जाऊ शकतात. अमेरिकन कायद्यानुसार, बजेट किंवा तात्पुरते निधी विधेयक मंजूर होईपर्यंत “अनावश्यक” सरकारी विभाग आणि सेवा बंद ठेवाव्यात. याला शटडाऊन असे म्हणतात. गेल्या दोन दशकांमधील हे अमेरिकेतील पाचवे मोठे शटडाऊन ठरू शकते. यामुळेच अमेरिकेवर मोठं संकट येऊ शकतं.
21 नोव्हेंबरपर्यंत सरकार खुले ठेवण्यासाठी रिपब्लिकननी यापूर्वी अल्पकालीन निधी विधेयक मांडले आहे. पण ते पुरेसे नाही असं डेमोक्रॅट्सचं म्हणणं आहे. त्यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उन्हाळी मेगा-बिलमधील मेडिकेड कपात रद्द करायची आहे आणि अफोर्डेबल केयर ॲक्टमधील प्रमुख कर क्रेडिट्स वाढवायचे आहेत. मात्र रिपब्लिकननी या मागण्या स्पष्टपणे नाकारल्या आहेत. दोन्ही बाजूंनी माघार न घेतल्याने, या आठवड्यात हाऊस मतदान होणार नाही.
त्यामुळे गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच निधीअभावी अमेरिकेतील अनेक सेवांवर परिणाम होईल. 2018 साली ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात, शटडाऊन 34 दिवस चालले होते. मात्र, यावेळी, हा धोका अधिक गंभीर मानला जात आहे, कारण ट्रम्प लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी आणि अनेक महत्त्वाचे प्रकल्प थांबवण्यासाठी याचा वापर करू शकतात. त्यांनी शटडाऊनच्या अगदी आधी हे संकेत दिले आहेत.
शटडाऊन म्हणजे काय ?
जेव्हा काँग्रेस संघीय संस्था चालविण्यासाठी वार्षिक खर्चाच्या बिलांवर सहमत होऊ शकत नाही तेव्हा सरकारी शटडाऊन होतं. अँटीडिफिशियन्सी कायदा एजन्सींना परवानगीशिवाय पैसे खर्च करण्यापासून प्रतिबंधित करतो, म्हणून जेव्हा पैसे संपतात तेव्हा सरकारचे बरेचसे काम देखील थांबते.
अमेरिकन सरकारच्या विविध विभागांना काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते, त्यामुळे काँग्रेसला बजेट किंवा निधी विधेयक मंजूर करावे लागते. परंतु जेव्हा राजकीय मतभेद किंवा गतिरोधामुळे निधी विधेयक अंतिम मुदतीत मंजूर होऊ शकत नाही, तेव्हा सरकारकडे खर्च करण्यासाठी कायदेशीररित्या अधिकृत निधी नसतो. अशा परिस्थितीत, अमेरिकन सरकारला अनावश्यक सेवा स्थगित करण्यास भाग पाडले जाते, ही प्रक्रिया सरकारी शटडाऊन म्हणून ओळखली जाते. हे सहसा तात्पुरते असते, परंतु यावेळी ट्रम्प अनेक विभाग कायमचे बंद करण्याची आणि हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहेत.
काय राहणार बंद, काय चालू राहणार ?
जर अंतिम मुदत चुकली तर, एजन्सींना “अपवादात्मक नसलेल्या” कर्मचाऱ्यांना, विशेषतः जे कर्मचारी जीवन किंवा मालमत्तेच्या संरक्षणात सहभागी नाहीत, त्यांना रजा देण्यास सुरुवात करावी लागेल. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 35 दिवसांच्या शटडाऊन दरम्यान कर्मचाऱ्यां3 लाख 40 हजार कर्मचाऱ्यांनाना सुट्टी देण्यात आली होती, तर उर्वरित कर्मचाऱ्यांनी सरकार पुन्हा सुरू होईपर्यंत पगाराशिवाय काम केले.
तर यावेळी, एफबीआय तपास, सीआयए ऑपरेशन्स, हवाई वाहतूक नियंत्रण, लष्करी सेवा, सामाजिक सुरक्षा तपासणी, मेडिकेअर दावे आणि माजी सैनिकांची आरोग्यसेवा यासारखी महत्त्वाची कामे सुरू राहतील. अमेरिकन पोस्टल सर्व्हिस ही स्वतःच्या उत्पन्नावर चालत असल्याने टपाल वितरणावरही परिणाम होणार नाही.
मात्र, अनेक एजन्सींमध्ये मोठी कपात होईल. शिक्षण विभाग त्यांच्या जवळपास 90% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल, असे असले तरी विद्यार्थ्यांना मदत सुरूच राहील. स्मिथसोनियन संग्रहालये आणि राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद राहतील. एफडीएने औषध आणि उपकरणांच्या मंजुरीमध्ये विलंब होण्याचा इशारा दिला आहे. आणि राष्ट्रीय उद्यान सेवा काही ठिकाणे बंद करेल, तर काही मर्यादित कर्मचाऱ्यांसह खुली राहतील.
