एका देशात समुद्रात सापडलं प्राचीन शहर… दुसऱ्या देशात सीक्रेट जागेचा लागला शोध; शास्त्रज्ञही झाले थक्क
क्युबाजवळील समुद्राच्या तळाला एक मोठा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांना समुद्रात 2000 फूट खाली अनेक वस्तू सापडल्या आहेत. ज्या एखाद्या प्राचीन शहरासारख्या दिसत आहेत.

आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये प्राचीन संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत. अशातच आता क्युबाजवळील समुद्राच्या तळाला एक मोठा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांना समुद्रात 2000 फूट खाली अनेक वस्तू सापडल्या आहेत. ज्या एखाद्या प्राचीन शहरासारख्या दिसत आहेत. 2001 मध्ये कॅनेडातील इंजिनियर पॉलीना झेलित्स्की आणि त्यांचे पती पॉल वेन्झवेग यांनी हे शहर शोधले होते.
पॉलीना झेलित्स्की आणि पॉल वेन्झवेग या जोडप्याची एक कंपनी आहे, जी समुद्राची खोली मोजण्यासाठी लागणारी उपकरणे बनवते. समुद्राच्या क्षेत्राचा नकाशा बनवताना त्यांना हे शहर सापडले आहे. क्युबाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ समुद्राच्या तळाशी सोनार स्कॅनिंग करण्यात येत होते. त्यावेळी त्यांना तळाशी अनेक वेगवेगळे आकार दिसले. यात पिरॅमिडसारखा आकार, क्रॉसरोडसारख्या ठिकाणांचा समावेश होता.
स्कॅनिंगदरम्यान दिसलेले काही दगड 8 ते 10 फूट लांब होते आणि ते एकमेकांशी क्रॉसरोडसारखे जोडलेले होते. पॉलीना यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ‘हे ठिकाण एखाद्या प्राचीन शहरी केंद्रासारखे दिसत आहे. ही आश्चर्यकारक रचना आहे. आम्ही या ठिकाणी कॅमेरे आणि रोबोट पाठवण्याचा प्रयत्न केला मात्र समुद्राची खोली जास्त असल्याने फोटो काढता आले नाही. मात्र काही क्लिप्स मध्ये यातील संरचना या मानवाने बनवलेल्या संरचनांसारख्या असल्याचे दिसले. यात दगडांवर काढलेली चित्रे आणि इतर गोष्टींचा समावेश होता.
इजिप्तमधील पिरॅमिडपेक्षा जुने शहर
या शहराबाबत अनेक अहवाल समोर आले आहेत. यानुसार हे शहर खरोखर अस्तित्वात असेल तर ते 6000 वर्षांपेक्षा जास्त जुने असू शकते. म्हणजे ते इजिप्शियन पिरॅमिडपेक्षा जास्त जुने असेल. मात्र शास्त्रज्ञांचे यावर एकमत नाही. क्यूबन भूगर्भशास्त्रज्ञ मॅन्युएल इटुराल्डे यांनी सांगितले की, इतक्या खोल समुद्रात शहर बुडणे 50 हजार वर्षांपूर्वी शक्य झाले असते. मात्र मानवी संस्कृती त्यानंतर सुरु झाली. त्यामुळे जर हे शहर मानवनिर्मित असेल तर इतिहास बसलू शकतो.
अद्याप सखोल तपास नाही
या शहराबद्दल कोणताही मोठा तपास करण्यात आलेला नाही. याचे कारण म्हणजे खोल समुद्रात जाऊन तपास करणे खूप कठीण आणि महागडे आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध सागरी शास्त्रज्ञ सिल्व्हिया अर्ल यांनी 2002 मध्ये येथे डायव्हिंग करण्याची योजना आखली होती, मात्र निधी आणि परवानगीच्या अभावामुळे त्यांना योजना रद्द करावी लागली. बरेच लोक या शहराचा संदर्भ ‘अटलांटिस’ सारख्या हरवलेल्या शहराशी जोडत आहेत. मात्र याची पुष्टी झालेली नाही.
जपानजवळ सापडली अनोखी जागा
जपानजवळ देखील असेच एक ठिकाण आहे. याठिकाणी समुद्राखाली ‘योनागुनी स्मारक’ नावाचे खडक आहेत. तिथेही प्राचीन काळी मानवी संस्कृती अस्तित्वात होती असं बोललं जात आहे. मात्र याचेही सबळ पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.
