बांगलादेशी विसरले गुरूदेवांचे उपकार; रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले राष्ट्रगीत, त्यांची हवेलीच जाळली
Rabindranath Tagore Mansion : बांग्लादेश धार्मिक कट्टरवादाकडे झुकला आहे हे एका वर्षातील अनेक घटनांवरून समोर आले आहे. त्यात कार्यवाहक मोहम्मद युनुस यांच्या डोळ्यात तर भारत खुपत आहे. त्यातूनच बांगलादेशमध्ये हिंदूविरोधी गट सक्रिय झाले आहेत. काय घडले बांगलादेशात?

बांगलादेशात गेल्या एका वर्षांपासून धार्मिक कट्टरतावाद्यांचा उच्छाद सुरू आहे. त्याला अर्थातच स्थानिक काळजीवाहू सरकारचे समर्थन आहे. कार्यवाहक मोहम्मद युनुस यांच्या डोळ्यात तर भारत सातत्याने सलत आहे. बांगलादेशाची पूर्व पाकिस्तानाकडे वाटचाल सुरू झाली आहे. दंगेखोर हिंदूंना लक्ष्य करत आहेत. त्यातच बांगलादेशाचे राष्ट्रगीत लिहिलणारे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांची हवेली नष्ट करण्याचा प्रयत्न दंगेखोरांनी केला आहे. सिराजगंज जिल्ह्यात टागोर यांच्या वाडवडीलांची मोठी संपत्ती आहे. तिथे जुना बंगला आहे. दंगेखोरांनी त्याची तोडफोड केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे थातुरमातूर उत्तर स्थानिक पोलिसांनी दिले आहे. विशेष म्हणजे ही वास्तु पुरातत्व खात्याकडे आहे.
वाहनतळाच्या वादाचे निमित्त नि तडोफोड
स्थानिक माध्यमातील वृत्तानुसार, एक स्थानिक कुटुंब रवींद्र कचहरीबाडी म्हणजे रवींद्र स्मारक संग्रहालयाला भेट द्यायला पोहचले. तिथे दुचाकी वाहनतळावर त्यांचा स्थानिक सुरक्षा रक्षकांशी पार्किंग शुल्कावरून वाद झाला. वाद टोकाला गेला. सुरक्षा रक्षक आणि कर्मचार्यांनी भेट देणार्या पुरुषाला एका खोलीत डांबून फटके दिले. त्याचा राग नंतर जमावाच्या तोडफोडीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
या घटनेमुळे स्थानिकांचा राग अनावर झाला. त्यांनी सुरक्षा रक्षक, कर्मचार्यांना सोडून या वास्तूवरच हल्लाबोल केला. कचहरीबाडीच्या सभागृहात तोडफोड केली. तिथल्या संचालकांशी वाद घालत त्यांना मारहाण केली. सरकारच्या बीएसएस वृत्तसंस्थेने याविषयी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. BSS या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, पुरातत्व विभागाने या हल्ला प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती येत्या पाच दिवसात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे समोर आले आहे.
कचहरीबाडीचे सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख मोहम्मद हबीबूर रहमान यांनी सांगितले की, काही अपरिहार्य परिस्थितीमुळे सध्या हे संग्रहालय पर्यटकांसाठी बंद केल्याचे सांगितले. हा संपूर्ण परिसर सध्या सुरक्षा रक्षकांच्या देखरेखीखाली सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. बांगलादेशातील राजशाही विभागातील शहजादपूर येथील रवींद्रनाथ टागोर स्मारक ही टागोर कुटुंबाची जूनी आणि ऐतिहासिक वास्तू आहे. या ठिकाणी टागोर कुटुंबाचे निवास आणि महसूल कार्यालय होते. रवींद्रनाथ टागोर यांचे अनेक वर्ष याठिकाणी वास्तव्य होते. त्यांच्या अनेक प्रसिद्ध साहित्याला येथेच अंकुर फुटले. येथेच त्यांना अनेक कवी स्फुरल्या. अनेक कथांनी जन्म घेतला.
