Putin India Visit : भारत भूमीवर पाय ठेवण्याआधी पुतिन यांचं मोठं वक्तव्य, सगळ्या युरोपमध्ये खळबळ
Putin India Visit : युरोपियन देश अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नात अडथळे आणत आहेत. याउलट रशियाला शांतता नकोय असा आरोप करत आहेत. युरोपने रशियासोबत संपर्क तोडून स्वत:ला शांतता चर्चेबाहेर ठेवलं आहे असा आरोप पुतिन यांनी केला.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 4 आणि 5 डिसेंबर असे दोन दिवस भारत दौऱ्यावर येणार आहेत. पुतिन यांच्या भारत दौऱ्याची अमेरिकेसह जगात चर्चा आहे. कारण या दौऱ्यात अनेक महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी होणार आहे. सध्या रशियाचं युक्रेन विरोधात युद्ध सुरु आहे. हे युद्ध सुरु होऊन तीन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या रशियन कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, जेणेकरुन रशियाला आर्थिक रसद मिळणार नाही, यासाठी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. मात्र, अजूनही त्यांना यश मिळालेलं नाही. दुसऱ्याबाजूला युरोप हे युद्ध चालू ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
युरोपियन देश युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करुन आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. युरोपियन देशांनी युक्रेनला अनेक घातक शस्त्र दिली आहेत. त्यांच्यासाठी ही त्यांनी बनवलेल्या शस्त्रांची चाचणी करण्याची संधी आहे. त्यामुळे युक्रेन अजून माघार घेत नाहीय. या पार्श्वभूमीवर भारतात निघण्याआधी पुतिन यांनी युरोपियन देशांना मोठा इशारा दिला आहे. “युरोपला कुठला संघर्ष किंवा युद्ध हवं असेल, तर रशिया यासाठी पूर्णपणे तयार आहे. रशियाला हे युद्ध सुरु करण्याची इच्छा नाही. पण आम्हाला भाग पाडलं, तर मागे हटणार नाही” हे व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्ट केलं आहे.
युद्ध अधिक भयावह होत चाललं आहे
युद्ध रोखण्यावरुन पुतिन यांनी युरोपवर आरोप केला. युक्रेन विरुद्ध युद्ध रोखण्यासाठी युरोपने अशी डिमांड समोर ठेवलीय, जी मान्य केली जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले. पाश्चिमात्य देश खासकरुन युरोपियन यूनियन युक्रेनला शस्त्रास्त्र आणि आर्थिक अशी दोन्ही प्रकारची मदत करत आहेत. त्यामुळे रशिया आणि युरोपमधील तणाव आणखी वाढला आहे. दिवसेंदिवस रशिया-युक्रेनमधील युद्ध अधिक भयावह होत चाललं आहे.
म्हणून हे शहर महत्वाचं
रशिया-युक्रेन युद्ध आता आणखी तीव्र झालं आहे. पोकरेव्स्क शहर ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्याकडून जोरदार हल्ले सुरु आहेत. दुसऱ्याबाजूला युक्रेन त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. रणनितीक दृष्टीने हे शहर दोन्ही देशांसाठी महत्वाच आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात सैन्य साहित्याचा पुरवठा होतो, म्हणून हे शहर महत्वाचं आहे.
