India-US Relation : ट्रम्प शत्रुसारखे वागतायत पण भारत दोस्ती निभावतोय, अमेरिकेचा करुन दिला 8 हजार कोटींचा फायदा
India-US Deal : पुढच्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी भारताने अमेरिकेसोबत एक मोठा करार केला आहे. ट्रम्प शत्रुसारखे वागत असले तरी भारताने मात्र सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी भारत अमेरिकेसोबत एक मोठा करार करणार आहे. 8 हजार कोटींची ही डील आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलेला असताना हा करार होत आहे. भारत-अमेरिकेत अजून ट्रेड डीलही फायनल झालेली नाही. या दोन्ही मुद्यांवरुन दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. भारत आणि अमेरिकेत होणारा ताजा करार हा डिफेन्स डील आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, MH 60 R हेलिकॉप्टर ताफ्यासंबंधी अमेरिकेसोबत जवळपास 7995 कोटींचा प्रस्ताव आणि स्वीकृती पत्रावर स्वाक्षरी केली आहे. लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशनने बनवलेली ही हेलिकॉप्टर्स सर्व ऋतूंमध्ये प्रभावी आहेत.
भारताने जवळपास पाच वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात 2020 साली 24 MH60 R हेलिकॉप्टर विकत घेण्यासाठी अमेरिकेसोबत एक करार केलेला. MH60 R सीहॉक ब्लॅकहॉक हेलीकॉप्टरचा समुद्री वेरिएंट आहे. संरक्षण मंत्रालयानुसार ‘फॉलो ऑन सपोर्ट’ एक व्यापक पॅकेज आहे. यात सुट्टे भाग, सहाय्यक उपकरणं, उत्पादन समर्थन प्रशिक्षण, टेक्निकल सहकार्य आणि सुट्टयाभागांची दुरुस्ती अशा अनेक तरतुदी आहेत.
आत्मनिर्भर भारताचं विजन पूर्ण होईल
“या फॅसिलिटीमुळे देशात दीर्घकाळापर्यंत कॅपेबलिटी बिल्ड-अप होईल.अमेरिकी सरकारवरील अवलंबित्व कमी होईल. अशा प्रकारे आत्मनिर्भर भारताचं विजन पूर्ण होईल” असं मंत्रालयाने म्हटलं आहे. या करारामुळे MSMEs (मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेज) आणि अन्य भारतीय कंपन्यांची स्वदेशी उत्पादन आणि सेवांच्या विकासाला प्रोत्साहन मिळेल. सस्टेनमेंट सपोर्टमुळे MH60R हेलीकॉप्टर्सची ऑपरेशनल उपलब्धता आणि मेंटेनेंसमध्ये कमालीची सुधारणा होईल. यात अँटी-सबमरीन वॉरफेअर क्षमता सुद्धा आहे. आधी 3 MH-60R हेलीकॉप्टर्स 2021 मध्ये भारताला मिळाली होती.
पुतिन यांच्या दौऱ्यात कुठले करार होऊ शकतात?
पुढच्या आठवड्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात येतील, तेव्हा सुद्धा अनेक महत्वाचे संरक्षण करार होऊ शकतात. यात अतिरिक्त S-400 एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेण्याचा सुद्धा करार होऊ शकतो. रशियाने भारताला SU-57E ही पाचव्या पिढीची अतिरिक्त फायटर जेट्स देऊ केली आहेत. पण भारत स्वबळावर स्टेल्थ विमानांचं तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे SU-57E मध्ये भारत फार स्वारस्य दाखवेल याची शक्यता कमी आहे.
