
Donald Trump : जागतिक राजकारणाच्या पटलावर डोनाल्ड ट्रम्प हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के आयातशुल्क लागू केले आहे. ट्रम्प यांच्या या एका निर्णयामुळे भारताचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान होत आहे. अजूनही ते हा टॅरिफ मागे घेण्यास तयार नाहीत. ट्रम्प यांना त्यांच्याच देशातील तज्ज्ञ, त्यांच्या पक्षातील काही नेते विरोध करताना दिसत आहेत. परंतु ते माघार घ्यायला तयार नाहीत. असे असतानाच आता ट्रम्प यांनी लवकरच काहीतरी घडणार आहे, असं मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धावर भाष्य केलं आहे. त्यांनी नुकतेच ‘सीबीएस न्यूज‘ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याबाबतची प्रक्रिया नेमकी कुठवर आलेली आहे? यावर भाष्य केलंय. तसेच लवकरच काहीतरी मोठं घडेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रशिया आणि युक्रेन यांच्यात आम्हीच समेट घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रशियाने नुकतेच युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात तेथील एकूण 15 नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. या घटनेतील मृतांमध्ये काही महिला आणि लहान बालकांचाही समावेश आहे. अशा स्थितीत या युद्धाबाबत लवकरच काहीतरी मोठं घडेल,असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली.
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवने तुलनेने सोपे असेल, असे वाटले होते. पण ही प्रक्रिया अपेक्षेपेक्षा किचकट असल्याचेही यावेळी त्यांनी मान्य केले. सोबतच त्यांनी मी आतापर्यंत सहा ते सात संघर्ष थांबवलेले आहेत, असाही दावा ट्रम्प यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी इस्रायल-इराण, रवांडा-कांगो, आर्मेनिया-अझरबैजान, थायलंड-कंबोडिया, भारत-पाकिस्तान, इजिप्त-इथियोपिया, सर्बिया-कोसोवा या देशांतील संघर्षांचा दाखला दिला. या देशांतील संघर्षाचा उल्लेख करत मी लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत, असेही यावेळी ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, मी आतापर्यंत अनेक देशांतील संघर्ष सोडवलेले आहेत, असा दावा ट्रम्प करत असले तरी जागतिक नितीचे तज्ज्ञ मात्र ट्रम्प यांचा दावा फेटाळताना दिसतात. काही देशांतील संघर्ष अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही, असे या तज्ज्ञांकडू न सांगितले जाते. तसेच ट्रम्प या मुलाखतीत काहीतरी मोठे घडणार या केलेल्या विधानानंतर आता नेमकं काय घडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.