Russia Ukraine War : लहान मुलं वापरुन युक्रेन विरोधात युद्ध जिंकण्याचा रशियाचा खतरनाक प्लान, तुम्ही सून्न व्हाल
Russia Ukraine War : मागच्या तीन वर्षांपासून सुरु असलेलं रशिया-युक्रेन युद्ध कधी संपणार? या प्रश्नाच कोणाकडेच उत्तर नाहीय. या युद्धात अनेक निरपराध नागरिक, सैनिकांचा मृत्यू झाला. हे युद्ध जिंकण्यासाठी रशियाची गुप्तचर यंत्रणा KGB ने एक खतरनाक प्लान आखला आहे. त्यांची जी योजना आहे, ती ऐकून तुम्ही सुद्धा सुन्न व्हाल.

रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन तीन वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. अजूनही हे युद्ध थांबण्याची कुठलीही चिन्ह नाहीयत. रशियाने युक्रेनमध्ये खोलवर हल्ले केले. सुरुवातीला असं वाटलेलं की काही दिवसात या युद्धाचा निकाल लागेल. पण बलाढ्य रशियाला अजूनपर्यंत युक्रेनला नमवण जमलेलं नाही. त्यामुळे आता दहशतवादी संघटना ISIS चा फॉर्म्युला वापरुन हल्ला करण्याची रशियाची योजना आहे. युक्रेनकडून रशियाबद्दल असे दावे केले जात आहेत. रशियाची गुप्तचर यंत्रणा KGB युक्रेनमधील गरीब मुलांचा वापर करुन त्यांना फिदायनी हल्लेखोर बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. ‘द गार्डियन’ वृत्तपत्राने युक्रेनी अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या लहान मुलांचा युक्रेनविरोधात मानवी बॉम्ब म्हणून वापर करण्याची योजना आहे.
रशियाची गुप्तचर यंत्रणा KGB ने बॉम्ब स्फोट घडवून आणण्यासाठी लहान मुलांसह, युवा आणि युक्रेन नागरिकांची भरती चालवली आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. युक्रेनी समाजात अस्थिरता निर्माण करण्याचा KGB चा प्लान आहे, असा दावा युक्रेनी सुरक्षा सेवा SBU ने केला आहे. या रणनितीमध्ये रशियाच कमीत कमी नुकसान आहे. कारण ते फ्रंटलाइनपासून लांब राहणार आहेत. असं झाल्यास युक्रेनलाही थेटपणे रशियाला दोषी ठरवता येणार नाही. कारण हल्लेखोर स्वत: युक्रेनचा नागरिक असेल.
मरणाऱ्यांना स्वत:ला माहित नसतं, की…
द गार्डियनच्या रिपोर्टमध्ये SBU ने अनेक उदहारणं दिली आहेत. युक्रेन नागरिकांना खोटं बोलून स्फोटक उपकरण घेऊन जायला सांगितलं जातं. मरणाऱ्यांना स्वत:ला माहित नसतं, ते जे सामना घेऊन जातायत ती स्फोटकं आहेत. ते अजाणतेपणी आत्मघातकी हल्लेखोराचं काम करत आहेत. टेलिग्राम App च्या माध्यमातून रशिया अशा लोकांची भरती करत आहे. अशा प्लॅटफॉर्मवर पैशांच्या हव्यासापोटी युक्रेनी नागरिक रशियन गुप्तचर यंत्रणेच्या आमिषाला बळी पडत आहेत.
रशिया असं का करतय?
“युक्रेनच खोलवर नुकसान करण्याची रशियाची मोहीम 2023 च्या सुरुवातीला सुरु झाली. सुरुवातीला सैन्य वाहनं, पोस्ट ऑफिस आणि भरती केंद्र जाळणं अशा छोट्या-छोट्या घटनांचा समावेश होता. युक्रेनच्या पश्चिम क्षेत्रामध्ये असे हल्ले सुरु होते. युद्धाच्या मैदानापासून लांब असलेल्या प्रदेशात अशा कारवाया सुरु होत्या. लोकांमध्ये भ्रम पसरवून अस्थिरता निर्माण करणं हा त्यामागे उद्देश होता” असं SBU चे प्रवक्ते आर्टेम डेख्तियारेंको यांनी सांगितलं.
