
Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. विशेष म्हणजे आता सोनं थेट दीड लाखांच्या पुढे तर चांदीचा भाव साडे तीन लाखांच्याही पुढे गेले आहे. त्यामुळेच भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर सर्वच देशांत सोने चांदीचा भाव वधारत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही मौल्यवान धातू महाग होत असल्याने यामागे नेमकी कोणती शक्ती कार्यरत आहे? सोन्याचा भाव वाढण्याची कारणं कोणती आहेत, असे अनेक प्रश्न सामान्यांना पडत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती आणि जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव यामुळे सोने आणि चांदीचा भाव वाढत आहे. ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी घडतेय, ते समजून घेऊ.
रविवारी (26 जानेवारी) आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव प्रथमच 5,000 डॉलर प्रति औंसपर्यंत वाढला आहे. चांदीचा भावदेखील शुक्रवारी (23 जानेवारी) 102 डॉलर प्रति औंस या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ग्रिनलँडवर हल्ला केला. ग्रिनलँडचे प्रमुख सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहेत. ट्रम्प सातत्याने ग्रिनलँडविषयी अस्थिरता निर्माण करणारी विधानं करताना पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे त्यांनी इराणविरोधातही मोहीम उघडली आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे जागतिक पातळीवर सध्या भू-राजकीय तणाव निर्माण झाला आहे. परिणाम लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे वळले आहेत. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने हे दोन्ही धातू चांगलेच वधारताना दिसत आहेत.
दुसरीकडे फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेवरदेखील ट्रम्प यांच्या भूमिकांमुळे दबाव निर्माण होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकन डॉलरची स्थिती म्हणावी तेवढी समाधानकारक नाही. त्यामुळेही अमेरिकेत महागाई वाढत आहे. परिणामी अस्थिरता आणि दबावाची स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण जगात सोने, चांदी महाग होताना दिसत आहे. जानेवारी 2024 मध्ये सोन्याचा भाव 2000 डॉलर प्रति औंस इतका होता.
युक्रेन आणि रशिया युद्ध, गाझा पट्टी आणि इस्रायल यांच्यातील युद्ध, इराणमधील संघर्षाची स्थिती अशा सर्वच जागतिक घडामोडीत अमेरिकेचा सहभाग आहे. त्यामुळे एकंदरितच सगळीकडे अस्थिरता आणि अनिश्चिततेचं वातावरण असल्याने सुरक्षित आणि हमी असलेली गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोने, चांदीकडे पाहत असून त्याचा भाव वाढताना दिसतोय.