मोठी बातमी! जगाची झोप उडवणाऱ्या इस्रायलवर ड्रोन हल्ला, कुणी केलं हे धाडस?
इस्रायलवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. हुथी बंडखोरांनी येमेनमधील आपल्या नियंत्रणाखालील भागातून इस्रायलवर ड्रोन हल्ले केले आहेत. मात्र इस्रायलने हे हल्ले रोखले असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही काळापासून इस्रायलने अनेक देशांवर हल्ले केले आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धाने संपूर्ण जगाची झोप उडवली होती. अशातच आता इस्रायलवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. हुथी बंडखोरांनी येमेनमधील आपल्या नियंत्रणाखालील भागातून इस्रायलवर ड्रोन हल्ले केले आहेत. मात्र इस्रायलने हे हल्ले रोखले असल्याची माहिती समोर आली आहे.
हुथी बंडखोरांनी हल्ले केल्यानंतर इजिप्तच्या सीमेजवळील इस्रायली भागात सायरन वाजत होते. आयडीएफने येमेनमधून इस्रायलवर हल्ला झाल्याचे कबूल केले आहे. आयडीएफने सांगितले की, इस्रायली हवाई दलाने येमेनमधून इस्रायलवर डागलेले तीन ड्रोन पाडले, त्यापैकी दोन ड्रोन इस्रायली हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी नष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
याआधी इस्रायली संरक्षण दलांने 28 ऑगस्टला येमेनची हुथी-नियंत्रित राजधानी साना येथे हल्ला केला होता. यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी, यांच्यासह 9 मंत्री आणि दोन अधिकारी ठार झाले होते. 22 ऑगस्टला क्लस्टर शस्त्रांचा वापर करून हुथींनी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर देताना आयडीएफने हे हल्ले केले होते. 24 ऑगस्टला आयडीएफने हुथी लष्कराला टार्गेट केले होते.
पंतप्रधान अहमद अल-राहवी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती महदी अल-मशत यांनी राहवी आणि इतर नेत्यांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करताना बदला घेण्याची धमकी दिली होती. मशत म्हणाले होते की, ‘इस्रायल मधील कंपन्यांनी देश सोडावा हा माझा शेवटचा सल्ला आहे. जर निष्पाप येमेनी लोकांचे रक्त सांडले तर जगावर राज्य करणाऱ्या देशांचे सिंहासन आणि देशाचा बहुतांश भाग हादरेल. हुथी बंडखोर इस्रायलवर हल्ला करत राहतील आणि गाझाशी एकता दर्शवतील.’
पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती मशत यांनी 30 ऑगस्ट रोजी उपपंतप्रधान मोहम्मद मिफ्ताह यांची हुथी सरकारचे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. त्यानंतर 2 आणि 3 सप्टेंबर रोजी इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना हुथी सरकारने इस्रायलच्या अनेक भागात क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. तसेच हुथींनी उत्तरेकडील लाल समुद्रात इस्रायली तेल टँकरला लक्ष्य केल्याची माहिती समोर आली होती.
