Venezuela Oil : अमेरिकेने वेनेजुएलाच्या तेलात हात न घालण्यातच भारताचं भलं, अन्यथा 3 मोठे फटके बसतील
Venezuela Oil : अमेरिकेची नजर वेनेजुएलाच्या तेलावर आहे. जगात सर्वाधिक तेलसाठे हे वेनेजुएलामध्ये आहेत. वेनेजुएला एक तेल संपन्न देश असूनही गरीब आहे. आता अमेरिकेने वेनेजुएलामध्ये तेल उत्खन्न सुरु केल्यास भारतावरही त्याचा परिणाम होईल. भारताला तीन मोठे फटके बसू शकतात.

जगातील सर्वात मोठं तेल भंडार असलेल्या वेनेजुएलामधून तेल उत्खननाच्या दिशेने अमेरिका पुढे जात आहे. पहिल्या नजरेत हा अमेरिका आणि वेनेजुएलामधील द्विपक्षीय निर्णय वाटेल. पण याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होईल. कार्बन अकाउंटिंग फर्म ClimatePartner च्या एका नव्या विश्लेषणानुसार वेनेजुएलामध्ये तेल उत्पादन वाढवल्यास जगात शिल्लक असलेल्या कार्बन बजेटचा मोठा हिस्सा संपून जाईल. पर्यावरण बदल नियंत्रणात ठेवण्यासाठी जागतिक तापमान 1.5 डिग्री सेल्सियसच्या वर जाऊ न देण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे. भारताचही याला समर्थन आहे. तापमानाची ही मर्यादा ओलांडली गेली तर दुष्काळ, पूर, उष्णतेची लाट, समुद्राची पातळी वाढणं अशी संकटं अजून वाढतील. वेनेजुएलामध्ये मोठ्या प्रमाणात तेल काढण्याचा अर्थ असेल कार्बन बजेट वेगाने संपवणं. त्यामुळे 1.5 डिग्री सेल्सियसच हे लक्ष्य मोडलं जाऊ शकतं.
कागदावर वेनेजुएलाकडे जगातील सर्वाधिक तेलसाठे आहेत. पण हे तेल चिकट आणि सल्फरने भरलेलं असेल, तर याचा अर्थ असा होतो की, तेल काढणं, स्वच्छ करणं आणि त्याच्या वापरासाठी भरपूर ऊर्जेची आवश्यकता लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरतं. एका रिपोर्टनुसार, वेनेजुएलाच्या ओरिनोको बेल्टमधील तेल जगातील सर्वाधिक कार्बन सोडणारं तेल आहे. तुलना करायची झाल्यास नार्वेतून निघणाऱ्या तेलामुळे कमी प्रदूषण होतं. वेनेजुएलाच्या तेलामधून हजारपट जास्त कार्बन निघतं.
पहिला धोका
1.5 डिग्री सेल्सियस तापमानाची मर्यादा ओलांडली गेली, तर भारतासारख्या देशावर त्याचा अनेक पटींनी परिणाम होईल. भारत आधीच रेकॉर्ड हीटवेव, अनियमित पाऊस, पूर-दुष्काळ आणि शेती संकटाशी सामना करत आहे. ग्लोबल कार्बन बजेट वेगाने संपलं, तर तापमान वाढेल. भारताला उत्सर्जन कमी करण्यासाठी अजून कठोर नियमांचं पालन करावं लागेल.
दुसरा धोका
भारत आपल्या गरजेच्या जवळपास 85 टक्के कच्चं तेल सध्या आयात करतो. अमेरिकेने वेनेजुएलात मोठ्या प्रमाणात तेल उत्पादन आणि पुरवठ्यावर कंट्रोल केला तर भू-राजनितीक तणाव वाढेल. तेलाच्या किंमती उसळतील. पेट्रोल-डिझेल महागेल. वाहतुकीचा खर्च वाढेल. थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल.
तिसरा धोका
भारतात निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. जास्त तापमान आणि बिघडलेल्या मान्सूनचा अर्थ खराब पीक, पिकांच उत्पादन कमी, शेतकऱ्यांचं उत्पन्न घटणार. खाण्या-पिण्याच्या वस्तू महागणार. भारतीय आधीच हवेतील प्रदूषणाच्या समस्येचा सामना करत आहे. ग्लोबल तापमान वाढल्यास परिस्थिती अजून बिघडेल.
