ट्रम्पचे सल्लागार पीटर नवारो यांच्यावर भारताचा पलटवार, प्रत्येक दावा खोडून काढत झापलं

भारत आणि अमेरिका यांच्यात वाद गेल्या काही महिन्यात विकोपाला गेला आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादला आणि संबंध ताणले गेले. असं असताना ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर टीकास्त्र सोडलं होतं. पण आता भारताने पलटवार केले.

ट्रम्पचे सल्लागार पीटर नवारो यांच्यावर भारताचा पलटवार, प्रत्येक दावा खोडून काढत झापलं
ट्रम्पचे सल्लागार पीटर नवारो यांच्यावर भारताचा पलटवार, प्रत्येक दावा खोडून काढत झापलं
Image Credit source: Reuter/PTI/TV9 Network
| Updated on: Sep 05, 2025 | 6:43 PM

भारताने अमेरिकेच्या टॅरिफ नितीला भीक न घालता केराची टोपली दाखवली आहे. तसेच रशियाकडून तेल आयात करणं सुरुच ठेवलं आहे. त्यामुळे अमेरिकेचा जळफळाट झाला आहे. असं असताना अमेरिकेकडून भारताची बदनामी करण्याचा डाव सुरु झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचे सल्लागार पीटर नावारो यांनी खळबळजनक विधान केलं होतं. 31 ऑगस्टला त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यात त्याने ब्राह्मण, भारतीय लोकांच्या खर्चावर नफा कमवत आहे, असं वादग्रस्त विधान केलं होतं. यावरून बराच वाद झाला होता. रशियाकडून तेल खरेदी करताना ब्राह्मणांना नफाखोर म्हणणाऱ्या अमेरिकेला आता भारताने प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी उत्तर देत सांगितलं की, पीटर नवारो यांनी केलेली खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आम्ही पाहिली आहेत आणि ती स्पष्टपणे नाकारतो.

रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, आम्ही या विषयी यापूर्वीही बोललो आहोत. अमेरिका आणि भारत यांच्याती नाते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. दोन्ही देशात व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे. ही लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. या भागीदारीने अनेक बदल आणि आव्हानांना तोंड दिले आहे. व्यापार मुद्द्यांवर आम्ही अमेरिकेशी संवाद सुरू ठेवला आहे. चार सदस्य देशांमधील अनेक मुद्द्यांवर समान हितसंबंधांवर चर्चा करण्यासाठी आम्ही क्वाडकडे एक महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पाहतो. नेत्यांची शिखर परिषद सदस्य देशांमधील राजनैतिक सल्लामसलत करून निश्चित केली जाते.

अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर बोलताना जयस्वाल यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, ‘सध्या भारत आणि अमेरिका अमेरिकेतील अलास्कामध्ये संयुक्त लष्करी सराव करत आहेत आणि आम्ही धोरणात्मकदृष्ट्या एकत्र आहोत. याशिवाय, व्यापाराच्या मुद्द्यावरही अमेरिकन बाजूशी आमची चर्चा सुरू आहे.’

रशिया युक्रेन संघर्षावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी युक्रेन रशियामधील सुरु असलेल्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली. युक्रेनमधील संघर्ष लवकर संपवण्यासाठी आणि कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.