Amercia Iran War : आता फक्त सुरुवात, भविष्यात आणखी…मिसाईल सिटीतून डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी, इराणच्या डोक्यात काय?
इराणच्या IRGC ने शनिवारी होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे MQ-9 रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला. नव्याने तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने ही कारवाई केल्याचे इराणने म्हटले आहे.

Iran America War : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. हा संघर्ष संपावा यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न होत आहेत. परंतु अद्याप त्याला यश आलेले नाही. अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. तर दुसरीकडे इराणही चोख प्रतिकार करत आहे. दरम्यान, हा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे (IRGC) प्रमुख अहमद वाहिदी यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांतील संघर्ष आणखी पेटतो की काय, अशी शंका व्यक्त केली जातेय.
आमच्या शत्रूंना आगामी काळात…
‘आतापर्यंत जे घडले, ती केवळ सुरुवात आहे. आमच्या शत्रूंना आगामी काळात आणखी अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. इराणमधील क्षेपणास्त्र साठ्याची पाहणी करताना त्यांनी हे वक्तव्य केले. या ठिकाणाला इराणी माध्यमांमध्ये ‘मिसाइल सिटी’ म्हणून ओळखले जाते.
28 फेब्रुवारी रोजीनंतर तणाव वाढला
इराणचा विजय निश्चित होईल. सत्याचा विजय होईल आणि खोट्याचा पराभव होईल, असे सांगत त्यांनी अमेरिकेला लक्ष्य केले. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराण यांत्यातील तणाव अधिक वाढतच गेला. या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. याच हल्ल्यात इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इराणने आक्रमक रुप धारण करत प्रत्युत्तरादाखल आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले होते. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घातले होते.
अमेरिकेचे ड्रोन पाडले
दरम्यान, इराणच्या IRGC ने शनिवारी होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचे MQ-9 रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला. नव्याने तैनात केलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या मदतीने ही कारवाई केल्याचे इराणने म्हटले आहे. आतापर्यंत 58 अमेरिकन ड्रोन पाडल्याचा दावाही करण्यात आला. मात्र, या वृत्ताला स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही.
युद्ध किंवा शांततेच्या नावाखाली…
IRGC चे प्रवक्ते होसैन मोहेबी यांनीही अमेरिका कोणत्याही लष्करी परिस्थितीचा सामना करण्यासाठी इराण सज्ज असल्याचे सांगितले आहे. युद्ध किंवा शांततेच्या नावाखाली अनिश्चितता स्वीकारणार नसल्याची इराणची भूमिका असल्याचे त्यांमनी सांगितले. दरम्यान पाकिस्ताननेही हे युद्ध थांबवण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्न केले होते. परंतु यात यश आले नाही.
