Iran-Israel War: इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार मारले तर काय होईल?
आगामी काळात इस्रायाल इराणवर जीवघेणा हल्ला करण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यास काय होईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणमधील अनेक अधिकारी ठार झाले आहेत. त्यामुळे या युद्धाची तीव्रता आणखी वाढली आहे. आगामी काळात इस्रायाल इराणवर जीवघेणा हल्ला करण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यास काय होईल? इस्रायल युद्ध जिंकेल की इराण प्रतिहल्ला करेल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
1989 पासून सत्तेत
अयातुल्लाह रुहोल्लाह खामेनी यांच्या निधनानंतर 1989 मध्ये अयातुल्लाह अली खामेनी यांनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून सूत्रे हाती घेतली होती. या देशावर असणारे निर्बंध, आंतरराष्ट्रीय तणाव तसेच देशातील अंतर्गत विरोधाला न जुमानताही खामेनी यांनी इराणवर पकड मजबूत ठेवली आहे. ते केवळ इराणमध्येच नाही तर जगभरातील शिया मुस्लिमांमध्येही लोकप्रिय आहेत. अयातुल्लाह अली खामेनी सध्या 86 वर्षांचे आहेत, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला नाही तरीही ते आगामी काळात पदावरून पायउतार होऊ शकतात.
सध्या सुरु असलेल्या युद्धाच्या काळात इस्रायलने खामेनी यांच्या हत्येची योजना आखली होती अशी माहिती समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही माध्यमांमध्ये पसरणाऱ्या खामेनींच्या हत्येच्या योजनेच्या बातम्यांना विरोध केलेला नाही. एबीसी न्यूजच्या पत्रकाराने नेतान्याहू यांना याबद्दल प्रश्न विचारला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, “खामेनींचा खात्मा केल्याने इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेला संघर्ष वाढणार नाही, तर तो संपेल.”
इस्रायल खामेनींची हत्या करु शकतो का?
अयातुल्लाह अली खामेनी हे नेहमी कडक सुरक्षेत असतात. खामेनी यांनी सर्वोच्च नेते पदाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी इराण सोडलेले नाही. त्यांनी शेवटचा परदेश दौरा 1989 मध्ये केला होता. इस्रायलने इराणचे लष्करप्रमुख आणि रेव्होल्यूशनरी गार्ड्स प्रमुखांसह अनेक इराणी अधिकाऱ्यांची हत्या केली आहे. त्यामळे इस्रायसी गुप्तचर संस्था खामेनी यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. आगामी काळात नेतान्याहू यांच्याकडून आदेश मिळाल्यास ते खामेनींवर हल्ला करु शकतात.
खामेनींची हत्या झाली तर काय होईल?
इस्रायलच्या हल्ल्यात अनेक बडे नेते मारले गेले आहेत. या घटनेनंतर काही तासांतच त्यांच्या जागी इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र खामेनी यांची हत्या झाल्यास त्यांची जागा घेणे हे कोणत्याही नेत्यासाठी सोपे काम नाही. परराष्ट्र व्यवहार तज्ञ कमर आघा यांनी सांगितले की, जर अली खामेनी यांची हत्या झाली तर कोणीतरी निश्चितच त्यांची जागा घेईल आणि युद्ध सुरु राहू शकते. मात्र आतापर्यंत त्यांच्यानंतर येणारे सर्व नेते मारले गेले आहेत. त्यामुळे खामेनी यांची जागा घेऊ शकेल असा नेता इराणमध्ये नाही.
पुढे बोलताना कमर आघा म्हणाले की, खामेनी इराणमध्ये खूप लोकप्रिय आहेत, ‘इराणने त्यांच्या कार्यकाळात खूप प्रगती केली आहे. ते इस्लामिक क्रांतीदरम्यानही खूप लोकप्रिय होते आणि खूप चांगले वक्ता होते. त्यांच्यानंतर कोणीतरी हे पद सांभाळेल, पण इराणला त्यांच्याप्रकारे चालवणे कठीण होईल.’ तसेच काही तज्ज्ञांच्या मते खामेनींची हत्या झाल्यास इराण माघार घेऊ शकतो.
