
संपूर्ण जगाचे लक्ष पुन्हा एकदा इराणकडे वळले आहे. इराणमध्ये खामेनी सरकारविरुद्ध आंदोनल सुरू आहे. या आंदोलकांना रोखण्यासाठी इराण सरकारने कडक पावले उचचली आहेत. यात काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता अमेरिकेने या आंदोलनावर भाष्य केले असून इराण सरकारला गंभीर इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये घुसण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
इराणमध्ये सत्ता परिवर्तनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. सुरुवातील आर्थिक कारणांमुळे सुरू झालेल्या आंदोलनाला आता राजकीय वळण लागले आहे. आंदोलक “हुकूमशहाला मृत्युदंड द्या” आणि “मुल्लांनो, देश सोडून जा” अशा घोषणा देत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कारवाई कर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत काही लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील काही भागातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
कुहादश्तमध्ये आंदोलन सुरू असताना सुरक्षा दलांनी अमीरहेसम खोदयारीफर्द यांच्या डोक्यात गोळी झाडली. तर फोलादशहरमध्ये दरियूश अन्सारी बख्तियारीवंद यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. अझना आणि लॉर्डेगनमध्येही आंदोलकांनी जीव गमवावा लागला आहे. इराण इंटरनॅशनलने दिलेल्या वृत्तानुसार, मारवदाश्त शहरातही सुरक्षा दलांच्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला. शरीफी मोनफारेद असे या व्यक्तीचे नाव आहे.
इराणमधील आंदोलनावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले, की ‘जर आंदोलकांचे बळी जात राहिले तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘जर इराणने शांततापूर्ण निदर्शकांवर गोळीबार केला आणि त्यांच्याविरुद्ध हिंसाचार केला तर अमेरिका त्यांच्या मदतीला येईल. आम्ही यासाठी तयार आहोत.’ त्यामुळे आता इराण सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमेरिकन सैन्याने इराणमध्ये प्रवेश केल्यास संपूर्ण जगाची चिंता वाढण्याची शक्यता आहे.