इराणने दिली डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची सुपारी, 870 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर
एफबीआय आणि सीआयएसह जगातील अनेक गुप्तचर संस्थांनी दावा केला आहे की, ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणमध्ये रचला जात आहे. परंतु आता इराणमधूनच ट्रम्प यांची हत्या होण्याची बातमी आली आहे.

Iran Death Threat to Donald Trump: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष होऊ नये, यासाठी इराणकडून प्रयत्न झाले होते. परंतु इराणचे प्रयत्न अयशस्वी झाले. इराणला ज्याची भीती वाटत होती तोच निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. इस्त्रायल-इराण युद्धा दरम्यान ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला होता. आता ट्रम्प यांना हटवण्यासाठी इराण शेवटच्या पर्यायावर पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी इराणने सुपारी दिली आहे. ट्रम्प यांची हत्या करणाऱ्यास ८७० कोटी रुपयांचे बक्षीस इराण देणार आहे.
कोणी दिली धमकी
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या जवळच्या सहाय्यक आणि सल्लागार जावेद लारीजानी यांनी धमकी दिली आहे. इराणसाठी ट्रम्प यांना मारणे खूप सोपे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ट्रम्प त्यांच्या आलिशान घरात असताना त्यांच्यावर गोळीबार होण्याची शक्यता आहे. ट्रम्प एकटे आणि निश्चिंत असताना त्यांना मारले जाऊ शकते. जर इराणने ठरवले तर ते ट्रम्प यांना त्यांच्याच घरात मारू शकतो, अशी धमकी देण्यात आली आहे. ट्रम्प यांना मारणाऱ्या व्यक्तीला १०० अब्ज तोमनचे बक्षीस ठेवण्यात आले आहे जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ८७० कोटी रुपये आहे.
गुप्तचर संस्थांचा होता दावा
एफबीआय आणि सीआयएसह जगातील अनेक गुप्तचर संस्थांनी दावा केला आहे की, ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणमध्ये रचला जात आहे. परंतु आता इराणमधूनच ट्रम्प यांची हत्या होण्याची बातमी आली आहे. जावेद लारीजानी यांनी म्हटले की, इराणचे ड्रोन शक्तीशाली आहे. ते ड्रोन फ्लॉरिडामधील स्वीमिंग पूलपर्यंत जाऊ शकतात. त्या ठिकाणी ट्रम्प सनबाथ घेत असतात. इराणी ड्रोनच्या भीतीमुळे ट्रम्प आपल्या जीवनात सनबाथ घेण्याची चूक करणार नाही, असे जावेद लारीजानी यांनी म्हटले आहे.
निधी जमा करण्यासाठी मोहीम
ट्रम्प यांना मारण्यासाठी इराणमध्ये ब्लड पॅक्ट नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत निधी गोळा केला जात आहे. ट्रम्प यांना ‘खुदा का दुश्मन’ घोषित करणारा फतवा जारी केला जात आहे. ट्रम्प यांना मिळालेल्या धमकीनंतर अमेरिकन सुरक्षा एजन्सींची झोप उडाली आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
