पाकिस्ताननंतर या देशानेही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मागितला नोबेल पुरस्कार, नामांकनसुद्धा केले दाखल
डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्व देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. इराणच्या अणू उर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ले केले. तसेच अब्राहम करार करण्यासाठी पाऊल उचलले, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पुरस्कार मिळावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानंतर आणखी एका देशाने ही मागणी केली आहे. आता इस्रायलकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नोबेल पुरस्काराची मागणी करण्यात आली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केल्याचे जाहीर केले.
व्हाईट हाऊसमध्ये दिले पत्र
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. इराण-इस्त्रायल संघर्ष थांबल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. यावेळी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका खाजगी डिनर दरम्यान, नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार समितीला पाठवलेले नामांकन पत्र सुपूर्द केले. यावेळी नेतन्याहू यांनी ट्रम्प यांनी शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. ते म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक देश आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते नोबेल पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र आहेत. मी नोबेल पुरस्कार समितीला यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यानंतर नेतान्याहू यांनी ते नामांकन पत्र ट्रम्प यांना दिले. नामांकन पत्र मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी खूप खूप धन्यवाद, असे उत्तर दिले.
नेतन्याहू यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी मध्य पूर्व देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. इराणच्या अणू उर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ले केले. तसेच अब्राहम करार करण्यासाठी पाऊल उचलले. त्यामुळे या प्रदेशात शांतता निर्माण झाली. ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे कौतूक केवळ इस्त्रायल नाही तर जगभरातील ज्यू लोकांकडून कौतूक केले जात आहे. इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांची टीम सर्व आव्हान पेलण्यास सक्षम आहेत, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
नेतन्याहू यांचा दौरा महत्वाचा
बेंजामिन नेतन्याहू यांचा हा अमेरिका दौरा गाझामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आहे. अमेरिकेने इस्त्रायलवर गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी दबाव आणला आहे. दुसरीकडे अमेरिकेस रवाना होण्यापूर्वी नेतन्याहू यांनी म्हटले होते की, मला ट्रम्प यांच्यावर विश्वास आहे. ते गाझामधील युद्धसुद्धा थांबवणार आहेत.
