Donald Trump : टॅरिफ अस्त्राचा भारताच्या बाजारावर किती परिणाम होणार? काय काय महागणार ?; एका क्लिकवर घ्या जाणून..
1 ऑगस्टपासून भारतावर लागू होणाऱ्या नवीन टॅरिफचा थेट परिणाम भारतावर होईल. अमेरिकेने भारतावर लादलेल्या 25 % टॅरिफमुळे भारतीय निर्यातीवर मोठा परिणाम होईल. अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसू शकतो. टॅरिफमुळे या वस्तूंच्या किमती वाढतील आणि अमेरिकन बाजारपेठेत भारताची स्पर्धा कमी होईल. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो आणि निर्यात घटू शकते.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि अमेरिका यांच्यातील टॅरिफ चर्चेच्या सहाव्या फेरीपूर्वी आणि टॅरिफसाठी 1 ऑगस्टची अंतिम मुदत देण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादला. यासोबतच रशियासोबत व्यवसाय केल्याबद्दल भारतावर दंड आकारण्याबाबतही ट्रंप बोलले आहेत. जर ट्रम्प यांनी लादलेला टॅरिफ 1 ऑगस्टपासून लागू झाला तर त्याचा थेट परिणाम भारतातील अनेक व्यावसायिक क्षेत्रांवर होईल, तो कसा, कोणत्या क्षेत्रावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.
टेक्सटाइल आणि गारमेंट्सवर परिणाम
भारत हा कापड आणि वस्त्रांचा मोठा निर्यातदार आहे. अमेरिका हे बहुतेक कपडे आणि पादत्राणे भारताकडून खरेदी करते. 25 टक्के टॅरिफ आणि दंडामुळे या वस्तू अमेरिकन बाजारपेठेत महाग होतील. याचा परिणाम भारतीय कंपन्यांच्या ऑर्डर आणि शिपमेंटवर होऊ शकतो आणि निर्यात कमी होऊ शकते.
ज्वेलरी आणि डायमंड
भारत हा जगातील सर्वात मोठा हिरा निर्यात करणारा देश आहे. अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणात दागिने आणि हिरे खरेदी करते. मात्र नवीन टॅरिफनंतर त्यांच्या किमती वाढतील. अशा परिस्थितीत, अमेरिकन खरेदीदार हे भारताऐवजी इतर देशांमधून हिरे आणि दागिने मागवू शकतात.
ऑटोमोबाइल सेक्टरही अडचणीत
भारत हा अमेरिकेला ऑटोमोबाईल्स आणि ऑटो पार्ट्सचीदेखील निर्यात करतो. स्टील आणि ॲल्युमिनियमवर आधीच 25 % कर लादण्यात आला आहे आणि आता 1 ऑगस्टपासून ऑटो क्षेत्रावर 25% कर लादला जाईल, त्यामुळे त्यांची मागणी कमी होऊ शकते.
मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्सनाही बसू शकतो फटका
भारत दरवर्षी अमेरिकेला सुमारे 14 अब्ज डॉलर्सचे मोबाईल, टेलिकॉम आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने विकतो. टॅरिफमुळे त्यांच्या किमती वाढतील आणि अमेरिकन खरेदीदार इतर देशांकडे वळू शकतात. यामुळे भारताची अब्जावधी डॉलर्सची निर्यात कमी होऊ शकते. याशिवाय, टॅरिफचा परिणाम रासायनिक क्षेत्रावरही दिसून येईल.
या क्षेत्रांवरही होऊ शकतो 25 टक्के टॅरिफचा परिणाम
औषधे (फार्मा), सेमीकंडक्टर, ऊर्जा उत्पादने (तेल, वायू, कोळसा, LNG) आणि तांबे यासह काही क्षेत्रांना अमेरिकेच्या शुल्कातून सूट देण्यात आली होती, परंतु 1 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या शुल्कात या सर्व गोष्टींचा समावेश असू शकतो. त्यामुळे त्यांच्या निर्यातीवरही परिणाम होणे स्वाभाविक आहे.
भारताला किती नुकसान होऊ शकतं ?
1 ऑगस्टपासून भारतावर लागू होणाऱ्या नवीन टॅरिफचा थेट परिणाम भारतावर होईल. तज्ज्ञांच्या मते, भारताची वार्षिक निर्यात 2 ते 7अब्ज डॉलर्सने कमी होऊ शकते. 2023-24 मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे 77.52 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू निर्यात केल्या. हा आकडा भारताच्या एकूण निर्यातीच्या सुमारे 18 % आहे. अशा परिस्थितीत, हा धक्का भारतासाठी खूप मोठा मानला जात आहे.
