डोनाल्ड ट्रम्प अडचणीत, व्हेनेझुएलावर हल्ला केल्याने अमेरिकेतूनच होतोय भयंकर विरोध; थेट…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. त्यानंतर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना न्यूयॉर्कमध्ये कैद ठेवण्यात येणार आहे. अमेरिकेत आता ट्रम्प यांनाच विरोध होत आहे.

Zohran Mamdani Vs Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेच्या सैनिकांनी व्हेनेझुएला या देशावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर या सैनिकांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो तसेच त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईनंतर आता जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारवाईचे काही देशांना समर्थन केले आहे. तर काही देशांनी त्यांची ही कारवाई म्हणजे संबंधित देशाच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला आहे, असे मत व्यक्त केले आहे. निकोलस मादुरो यांच्याविरोधात अमेरिकेत खटला चालवला जाणार आहे. सध्या ते अमेरिकेच्या ताब्यात आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन सैनिकांच्या या कारवाईचे कौतुक करत असले तरी त्यांच्या देशाचे नेते तथा न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सडकून टीका केली आहे. ममदानी यांनी ट्रम्प यांच्या धोरणाचा कठोर विरोध केला आहे.
ममदानी यांची ट्रम्प यांच्यावर टीका
अमेरिकन सैनिकांच्या कारवाईनंतर झोहरान ममदानी यांनी एक्स या समाजमाध्यमावर आपली प्रतिक्रिाया दिली आहे. अमेरिकेची ही भूमिका म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे आणि सार्वभौमत्त्वावरील हल्ला आहे. असे म्हटले आहे. कोणत्याही देशावर एकतर्फी कारवाई केली जात असेल तर ते कृत्य थेट युद्धकृत्य मानले जाते. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा थेट परिणाम न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या नागरिकांवरही होणार आहे, असे ममदानी म्हणाले आहेत.
हे कृत्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन
‘व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडण्यात आले आहे. या दोघांनाही न्यूयॉर्क शहरातच ताब्यात ठेवण्यात येणार आहे. तशी माहिती मला अमेरिकन लष्कराने दिली. कोणत्याही सार्वभौम राष्ट्रावर एकतर्फी हल्ला करणे हे युद्धाचे कृत्य आहे. सोबतच हे कृत्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघनही आहे,’ असे मत ममदानी यांनी व्यक्त केले.
अमेरिका-व्हेनेझुएला वादात आता पुढे काय होणार?
सोबतच व्हेनेझुएलामधील हजारो नागरिक न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. अमेरिकेच्या या कृत्याचा परिणाम या नागरिकांवर तसेच इतर लोकांवरही पडेल, असा दावा करत ट्रम्प यांचा निर्णय चुकीचा असल्याची भावना ममदानी यांनी व्यक्त केल आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या धोरणाला आता त्यांच्याच देशातून विरोध होत असल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अमेरिका-व्हेनेझुएला वादात आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
