Pahalgam Terror Attack : जिनपिंग यांचा दुटप्पीपणा, चीन आज जे भारताला सांगतोय, तसं तैवानच्या बाबतीत करतो का?
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चीन उघडपणे पाकिस्तानच समर्थन करतोय. खरतर यामध्ये चीनचा दुटप्पी चेहरा उघड झाला आहे. चीन आज जे भारताला सांगतोय, तसं तैवानच्या बाबतीत करतो का?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत चीनने पाकिस्तानच समर्थन केलं आहे. रविवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांना संयम बाळगण्याच आवाहन केलं. “सध्याच्या घटनाक्रमावर चीनच बारीक लक्ष आहे. आम्ही निष्पक्ष चौकशीच समर्थन करतो” असं वांग म्हणाले. “भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव कोणाच्याही हिताचा नाही. यामुळे क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो” असं वांग यांचं मत आहे. भारताला संयमाच आवाहन करणारा चीन तैवानबाबत असं वागतो का? तैवान बाबत चीनच धोरण संयमी आहे का? यातून चीनचा दुटप्पीपणा दिसून येतो.
“संघर्ष भारत-पाकिस्तान दोघांच्या हिताचा नाही तसच दक्षिण आशियाच्या स्थिरतेच्या दृष्टीने सुद्धा हे चांगलं नाही. दोन्ही देशांनी संयम बाळगला पाहिजे. परस्परासोबत मिळून शांतता निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत” असं चीनचे परराष्ट्रमंत्री वांग म्हणाले.
चीनचं समर्थनाबद्दल कौतुक
पाकिस्तानने भारताच्या निर्णयांना युद्ध कारवाई ठरवलं आहे. पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांनी वांग यी यांच्याशी चर्चा करताना पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध लढाईसाठी कटिबद्ध असल्याच सांगितलं. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर एकतर्फी आणि बेकायद पाऊल उचलण्याचा आरोप केला. पाकिस्तानने चीनचं समर्थनाबद्दल कौतुक केलं. सामूहिक रणनिती सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
भारतासोबत एकजुटीने उभे
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेविड लॅमी यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारताच्या दहशतवादाप्रती असलेल्या शून्य सहिष्णूता धोरणाचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जयशंकर यांनी अमेरिका, फ्रान्स, इराण आणि ब्रिटनसह अनेक जागतिक नेत्यांसोबत चर्चा केली. या सर्व नेत्यांनी हल्ल्याची निंदा केली व भारतासोबत एकजुटीने उभे असल्याच सांगितलं.
