पाकिस्तानसाठी 120 तास अत्यंत धोक्याचे… भयानक रक्तपात होणार? रुग्णालयातून फर्मान लीक
पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी माजण्याची शक्यता असून, 27 सप्टेंबरच्या PTI आंदोलनापूर्वी इस्लामाबादेत मोठा रक्तपात होण्याचा धोका आहे. रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून, सुट्ट्या रद्द व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश लीक झाले आहेत. यामुळे सरकार मोठ्या हिंसाचाराची तयारी करत असल्याचे स्पष्ट होते.

पाकिस्तानमध्ये अंतर्गत यादवी माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीओके आणि बलूचिस्ताननंतर राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा रक्तपात होण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी इम्रान खान यांच्या पीटीआय पार्टीने इस्लामाबादेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानात पीटीआयच्या नेत्यांची धरपकड सुरू आहे. आज एका मंत्र्याचं अपहरण करण्यात आलं आहे. तसेच 27 तारखेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थेट रुग्णालयांनाच सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या 120 तासात इस्लामाबादेत मोठी मास कॅज्युअल्टी होण्याची शक्यता आहे. यावेळी सार्वजनिक संपत्तीचंही मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात बंद आहेत. त्यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी पीटीआय पार्टीने 27 सप्टेंबर रोजी इस्लामाबादेत देशव्यापी मार्चची घोषणा केली आहे. या आंदोलनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी सरकार आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये भीती पसरलेली दिसत आहे. त्यामुळे पीटीआयच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत मिळेल त्याची धरपकड सुरू करण्यात आली आहे. काही नेत्यांना तर नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
सुट्ट्या रद्द
इंटरनॅशनल मीडिया ‘आउटलेट ड्रॉप’ साइटला काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यातून पाकिस्तानात मोठा रक्तपात होण्याचे संकेत मिळत आहेत. या कागदपत्रानुसार, इस्लामाबादेतील सर्व मोठ्या रुग्णालयांना नियोजित ऑपरेशन पुढे ढकलण्यास सांगण्यात आलं आहे. रुग्णालयांच्या सर्जिकल विभागांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
एवढेच नव्हे तर रुग्णालयातील सर्व डॉक्टर, सर्जन, नर्स आणि सपोर्ट स्टाफच्या सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी सुट्टीवर गेले होते, त्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारला धसका, रुग्णांचे हाल
सरकारच्या या आदेशाचा सर्वाधिक परिणाम सामान्य नागरिकांवर झाला आहे. तसेच रुग्णांवरही त्याचा परिणाम झाला आहे. ज्या रुग्णांच्या ऑपरेशनच्या तारखा फिक्स होत्या, त्यांना फोन करून त्यांचे ऑपरेशन पुढे ढकलल्याचं सांगितलं जात आहे. गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे. दरम्यान, शहबाज शरीफ सरकारने मात्र, रुग्णालयाला आदेश दिल्याबाबतची अधिकृत माहिती दिली नाही. रुग्णालये खाली का केले जात आहेत? त्याचा 27 सप्टेंबरच्या आंदोलनाशी काही संबंध आहे का? यावर सरकारने भाष्य केलेलं नाही. मात्र, कारण नसताना रुग्णालये ज्या पद्धतीने रिक्त केले जात आहेत, त्यावरून सरकारने 27 सप्टेंबरच्या आंदोलनाचा धसका घेतल्याचं स्पष्ट होत आहे.
27 सप्टेंबरला काय होणार?
रविवारी 27 सप्टेंबर रोजी इस्लामाबादचे रस्त्यांना युद्धाचं स्वरुप येणार असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या नेत्याला सोडवण्यासाठी पीटीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. तर दुसरीकडे पीटीआयचं आंदोनल चिरडण्यासाठी सरकारनेही पोलीस आणि सैन्याचा मोठा फौजफाटा सज्ज ठेवला आहे. साम दाम दंड भेदाने कोणत्याही परिस्थितीत आंदोलन चिरडण्याच्या मनस्थितीत सरकार आहे. रक्तपात करावा लागला तरी चालेल पण आंदोलन चिरडलं गेलंच पाहिजे, या भूमिकेत सरकार आहे. त्यामुळेच रुग्णालयांना सरकारने आदेश दिले आहेत. सरकारचे हे आदेश लिक झाल्याने पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
