Pakistan Crisis : भारताच्या वाईटावर असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका, एकारात्रीत अब्जो रुपये बुडाले
Pakistan Crisis : असं नाहीय की या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला नाही. पण योजना जमिनीवर प्रत्यक्षात उतरलेल्या नाहीत. जॉइंट चेंबर ऑफ कॉमर्सने व्यापारात घट झाली, त्याची पुष्टि केली आहे. पाकिस्तानचं दररोज जबर आर्थिक नुकसान होत आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या कूटनितीक तणावाचा परिणाम आता प्रत्यक्षात दिसू लागला आहे. दोन्ही शेजारी देशांचे संबंध बिघडले आहेत. याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय.समोर आलेल्या आकड्यांनुसार दोन्ही देशांच्या व्यापारात घसरण झाली आहे. ही थोडीथोडकी घसरण नाही, थेट व्यापारात थेट 53 टक्के घसरण नोंदवण्यात आलीय. जिथे आधी ट्रकच्या रांगा लागायच्या. सामानांची आयात-निर्यात व्हायची तिथे आता सन्नाटा पसरला आहे. खासकरुन यामुळे पाकिस्तानी निर्यातदारांची झोप उडाली आहे. त्यांना दर महिन्याला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. एकवेळ दोन्ही देशांमध्ये जवळपास 2.61 अब्ज डॉलरच्या आसपास व्यवहार व्हायचा. पण आता त्यात घसरण होऊन हा व्यापार 594 मिलियन डॉलरवर आलाय. पाकिस्तानातील प्रतिष्ठीत वर्तमानपत्र ‘द नेशन’ने आपल्या रिपोर्टमध्ये अफगाणिस्तानसोबत व्यापारात 53 टक्के घसरण झाल्याची पुष्टी केली आहे.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सीमावर्ती भागात मागच्या काही काळात हिंसक झडपा झाल्या आहेत. परिणामी व्यापारी मार्ग बंद झाले आहेत. रिपोर्ट्नुसार, रस्ते बंद होणं आणि सीमेवरील तणावामुळे पाकिस्तानी निर्यातदारांना दर महिन्याला जवळपास 177 मिलियन डॉलरच नुकसान झेलावं लागतय. भारतीय रुपयात ही रक्कम अब्जोंमध्ये आहे.
पाकिस्तानने जम बसलेली बाजारपेठ गमावली
आर्थिक विषयाचे जाणकार सांगतात की, भले या तणावामुळे नुकसान दोन्ही बाजूला होत असलं, तरी फटका मात्र सर्वात जास्त पाकिस्तानला बसतोय. “सरकारी आणि बिगर सरकारी आकड्यांवरुन हेच दिसून येतय की, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या रुपाने एक सर्वात मोठी आणि जम बसलेली बाजारपेठ गमावली आहे” असं आर्थिक विश्लेषक कुतबुद्दीन याकुबी म्हणाले.
अफगानिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इन्वेस्टमेंटचे पहिले डेप्युटी मीरवाइस हाजी जादा आणखी एका महत्वाच्या पैलूकडे लक्ष वेधलं. “आमचे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. पण पाकिस्तानच नुकसान जास्त झालं आहे. फक्त अफगाणिस्तान सोबत व्यापार थांबला हेच नुकसान नाहीय, तर पाकिस्तानचा मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा अफगाणिस्तानातूनच जातो. तो रस्ता सुद्धा बंद झाला आहे. पाकिस्तानच्या क्षेत्रीय व्यापारिक महत्वाकांक्षेला हा मोठा धक्का आहे”
पाकिस्तानकडून खो घातला जातोय
दोन्ही बाजूचे व्यापारी नुकसान सोसत आहेत. चेंबरच्या अधिकाऱ्यांनुसार, मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. पण पाकिस्तानकडून खो घातला जातोय. अडथळे आणले जातायत.
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानसोबत मिळून एक सात सदस्यीय समिती बनवली होती, असं जॉइंट चेंबरचे प्रमुख खानजान अलोकोजई यांनी सांगितलं. या निर्णयाला इस्लामिक अमीरातची (अफगानिस्तान सरकार) मंजुरी मिळाली होती. दोन्ही देशातील खासगी क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपसात भेटावं, विचारांच आदान-प्रदान करावं अशी योजना होती. पण ही प्रस्तावित बैठक टाळण्यात आली.
