
Pakistan Afghanistan Clash : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. अगोदर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर आता अफगाणिस्तानेही पाकिस्तानचे 58 सैनिक मारले आहेत. दोन्ही देशांत सध्या तणाव वाढलेला असताना आता अफगाणिस्तानातील तालिबान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला थेट धमकीच दिली आहे. आता या धमकीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
पाकिस्तानने गुरुवारी काबुलवर हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सैन्यात संघर्ष पाहायला मिळाला. या संघर्षानंतर आम्ही पाकिस्तानचे 58 सैनिक मारले आहेत, असा दावा अफगाणिस्तानकडून केला जातोय. या सर्वघडामोडी चालू असताना अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या संघर्षावर भाष्य केले आहे. या संघर्षाचे शांतीपूर्ण समाधान काढावे, अशी आमची इच्छा आहे. परंतु आमच्या या प्रयत्नांना यश आलं नाही, तर आमच्याकडे दुसरा पर्यायदेखील उपलबद्ध आहे, असे मुत्तकी यांनी सांगितले आहे.
तसेच अफगाणिस्तानचे पाकिस्तानी लोक तसेच पाकिस्तानी सरकारसोबत नेहमीच चांगले संबंध राहिलेले आहेत. मात्र पाकिस्तानातील काही घटक आहेत, ज्यांना या अडचणी निर्माण करायच्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर असतानाच पाकिस्तान आणि अफगाणिस्ता यांच्यात संघर्ष चालू झाला आहे. मुत्तकी भारतात आल्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी चांगीलच आगपाखड केली होती. त्यांनी अफगाणी नागरिकांना आश्रय देऊन पाकिस्तानने मोठी चुक केली, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तानस संघर्ष चालू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षात पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या 19 लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या या कारवाईला उत्तर म्हणून अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सैनिक मारले गेले. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या क्षेत्रीय अखंडतेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आमचे सशस्त्र बल चोख प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असे अफगाणिस्तानने ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.