कंदहारवर थेट बॉम्बहल्ले…पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर अटॅक, आता नव्या युद्धाची धास्ती!
सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चांगलीच लढाई रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने अफगाणिस्तानातील काही ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत.

Afghanistan And Pakistan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांच्या सीमांवर सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. यामुळेच आता या भारताच्या अगदी जवळ असलेल्या या दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकते की काय? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानातील कंदहार प्रांतातील स्पिन बोल्दक भागात पाकिस्तानने ड्रोन हल्ले केले आहेत. तहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी तळांवर पाकिस्तानने हल्ले केले आहेत, असे सांगितले जात आहे. या हल्ल्यांची खात्री मात्र अद्याप होऊ शकलेली नाही. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारनेदेखील या कथित हल्ल्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टीटीपीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी पाकचा हल्ला
सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमेवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ले केले आहेत. टीटीपीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले करण्यात आले आहेत. फगाणिस्तानमध्ये टीटीपी या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांना आसरा दिला जात आहे. पुढे हेच दहशतवादी पाकिस्तानवर हल्ला करतात, असा पाकिस्तानचा दावा आहे.
तालिबान अजूनही गप्प, कारण काय?
अफगाणिस्तानातील स्पिन बोल्दक या भागात झालेल्या कथित हल्ल्याविषयी तेथील तालिबानी सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी ऑगस्ट महिन्यात नंगरहार आणि खोस्त या प्रदेशात पाकिस्तानने हल्ले केल्यानंतर तालिबान सरकारने तेथील पाकिस्तानी राजदूतांना बोलवून घेत हल्ल्यांबाबत विरोध दर्शवला होता.
तर हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ
पाकिस्तानने तीन दिवसांपूर्वी काबूलवर हल्ला केल्यानंतर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश एकमेकांसमोर एकमेकांविरोधात उभे आहेत. पाकिस्तानने सीमेचे उल्लंघन केले तर आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा अफगाणिस्तानने दिला आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारताच्या दौऱ्यावर
दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांची एकमेकांसोबतची जवळीक वाढत आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यात भारत-अफगाणिस्तान संबंधावर चर्चा होत आहे. असे असताना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ले चालू केले आहेत.
