भारताचा असा वार ज्यात पाकिस्तान पुरता घायाळ, सगळेच हैराण; नेमकं दुखणं काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अजूनही ताणलेलेच आहेत. भारताने पाकिस्तानवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.

भारताचा असा वार ज्यात पाकिस्तान पुरता घायाळ, सगळेच हैराण; नेमकं दुखणं काय?
narendra modi and shehbaz sharif
| Updated on: Jun 29, 2025 | 2:59 PM

India Vs Pakistan : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणलेले आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, सध्या या दोन्ही देशांनी एकमेकांवरील थेट हल्ले थांबवले आहेत. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानला ज्या जखमा झालेल्या आहेत, त्या अजूनही भळभळत आहेत.पाकिस्तानला मोठा फटका बसत आहे.

भारताच्या निर्णयाचा पाकिस्तानला फटका

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तासोबतच्या व्यापारावर अनेक प्रकारचे निर्बंध आणले आहेत.भारताने पाकिस्तानी मालवाहू जहाजांना भारतीय बंदरांवर प्रवेश निषिद्ध केला आहे.पाकिस्तानहून येणारे तसेच पाकिस्तानी माल वाहून नेणारे कोणत्याही जहाजास भारताच्या बंदरावर येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानला चांगलाच फटका बसत आहे. भारतामुळे पाकिस्तानी माल वाहून नेण्यासाठीची शिपिंग कॉस्ट वाढली आहे. माल वाहतूक करण्यास आणि इप्सित स्थळी वस्तू पोहोचवण्यास उशीर होत आहे.

वाहतुकीच्या खर्चातही वाढ झालेली

पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेल्या डॉन या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. भारताने घातलेल्या निर्बंधांमुळे वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाढला आहे. तसेच वाहतुकीच्या खर्चातही वाढ झालेली आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे. कराची चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष जावेद बिलवानी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलीय. भारताच्या कारवाईमुळे मालवाहतूक करणारी महत्त्वाची जहाजे पाकिस्तानला येत नाहीयेत.त्यामुळे मालवाहतुकीसाठी साधारण 30 ते 50 दिवसांचा उशीर होत आहे.

शिंपिंग कॉस्ट तसचे विम्याची रक्कमही वाढली

पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयातीसाठी आता फिडर जहाजांवर अवलंबून राहावे लागत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ झाली आहे, असेही बिलवानी यांनी सांगितले आहे. भारताने घातलेल्या निर्बंधांमुळे शिंपिंग कॉस्ट तसचे विम्याची रक्कमही वाढवण्यात आलेली आहे. असे असले तरी एकूण निर्यातीवरील प्रभाव नगण्य आहे, असा दावा त्यांनी केलाय.

दरम्यान, आता पाकिस्तानच्या खिशाला बसत असलेली ही झळ पाहता, तेथील सरकार भारताला आयात-निर्यातीवरील निर्बंध हटवण्याची विनंती करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.