अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पाकिस्तानचे पंतप्रधान घेणार भेट, सोबत असतील असिम मुनीर, काय होणार घडामोडी
संयुक्त राष्ट्र महासभेची बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ जाणार आहेत. त्यांच्या सोबत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसीम मुनीरही असणार आहेत.जगभरात वातावरण अस्थिर असताना ही बैठक होत आहे.

एकीकडे भारत आणि पाकिस्तानचे संबंध कमालीचे ताणले गेले असताना आणि जगभरात वातावरण अस्थिर असताना या वर्षअखेर संयुक्त राष्ट्र महासभेची (UNGA) महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत जगभरातील नेते सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ देखील यूएनजीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला जात आहेत. या दरम्यान शहबाज शरीफ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात असे म्हटले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान येत्या २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. ही बैठक युएनजीए बैठकीच्या जागी न होता इतत्र होणार असल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि फिल्ड मार्शल असिम मुनीर देखील पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सोबतीला असणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या अनुपस्थिती
या बैठकीत पाकिस्तान आपल्या कडील पूरस्थिती आणि इस्राईल हल्ल्याचे जागतिक प्रभावांसंदर्भात चर्चा करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षअखेर होणाऱ्या या UNGA बैठकीला जाणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यासाठी अमेरिकेला जाणार आहेत.
संयुक्त राष्ट्र महासभेचे ८० वे सत्र ९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. ही उच्चस्तरीय बैठक २३ ते २९ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.या बैठकीत पहिले वक्ते ब्राझीलचे असणार आहेत. त्यानंतर अमेरिका या बैठकीला संबोधित करणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २३ सप्टेंबर रोजी युएनजीए पोडियममधून जागतिक नेत्यांना संबोधित करतील. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र सत्राला संबोधित करतील.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची उपस्थिती
भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री जयशंकर २७ सप्टेंबर रोजी या बैठकीला संबोधित करतील.या पूर्वी जुलै मध्ये जाहीर केलेल्या वक्त्यांच्या यादी पीएम मोदी यांचे नाव सामील होते. त्या यादीनुसार पीएम मोदी २६ सप्टेंबरला युएनजीए बैठकीला संबोधित करणार होते. परंतू वक्त्यांच्या यादीत आणखीही सुधारणा होऊ शकते असे म्हटले जात आहे.
चीन, पाकिस्तान, बांग्लादेश आणि इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष २६ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील. हे सत्र २२ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या ८० व्या वर्धापन दिना निमित्त एका बैठकीने सुरु होणार आहे.
