ख्वाजा साहेब, बरंय ना? देशात आगडोंब अन् पाकचा संरक्षण मंत्री टक लावून पाहतोय अभिनेत्रीचा फोटो
पाकिस्तान सध्या तीव्र आर्थिक आणि राजकीय संकटातून जात असताना, त्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ एका हॉलिवूड अभिनेत्रीच्या AI फोटोवरील कोड्याचे उत्तर देऊन गोत्यात आले आहेत. मर्लिन मुनरोच्या फोटोतील स्मार्ट वॉचवर टिप्पणी केल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. देशाची स्थिती गंभीर असताना मंत्र्यांच्या प्राथमिकतांवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या आगडोंब उसळला आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांची तुरुंगातून सुटका करावी म्हणून पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी राजधानी इस्लमाबादला वेठीस धरलं आहे. दुसरीकडे देशातील बलूच नागरिकांनीही पाक सैन्यावर हल्लाबोल सुरू ठेवलेला आहे. त्यातच अख्खा देश आर्थिक संकटातून भरडून निघत आहे. देशाला सावरण्याची वेळ आलेली असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ मात्र एका हॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्रीचे फोटो टक लावून पाहण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे ख्वाजा साहेब, बरंय ना? असं म्हणण्याची वेळ पाकिस्तानी नागरिकांवर आली आहे.
एआयद्वारे अभिनेत्रीचा फोटो तयार करण्यात आला होता. पन्नासच्या दशकातील या अभिनेत्रीच्या हातात स्मार्ट वॉच दाखवण्यात आली होती आणि त्यावर एक कोडं घालण्यात आलं होतं. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या कोड्याचं उत्तर दिलं आणि गोत्यात आले. त्यांना सोशल मीडियावरून ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे यावर ख्वाजा आसिफ यांनी आधीच खुलासा केला होता. पण टायमिंग इतका चुकीचा होता की आसिफ भयानक ट्रोल झाले. लोकांनी तर त्यांच्या उत्तरापेक्षा त्यांचे पद आणि त्यांच्या प्राधान्यक्रमावरच सवाल केले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरणं?
सोशल मीडियावर हॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री मर्लिन मुनरोचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोसोबत एक कोडं घालण्यात आलं होतं. या फोटोत मर्लिनला 1950च्या दशकातील जुन्या अंदाजातील कपड्यात एका जुन्या हॉटेलच्या बाहेर उभं असलेलं दाखवण्यात आलं होतं. तिच्या भोवती जुन्या गाड्याही दाखवण्यात आल्या होत्या. या फोटोत तिच्या मनगटावर एक आधुनिक स्मार्टवॉच दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे लोकांचं लक्ष या घड्याळाकडे वेधलं होतं.
या फोटोत अशी कोणती गोष्ट आहे की, जी 1950 मध्ये नव्हती? असा सवाल नेटकऱ्यांना विचारण्यात आला होता. लोकांसाठी हे कोडं घालण्यात आलं होतं. मग काय? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याचं उत्तर शोधलं. आसिफ यांनी 13 ऑक्टोबर रोजी या पोस्टवर केवळ ‘Watch’ असं लिहून उत्तर दिलं होतं. सोबत हास्यमुद्रा असणारी इमोजीही पोस्ट केली होती. बस्स… नेमकी माशी तिथेच शिंकली. देशातील नागरिकांनी चाचा आसिफ यांची खेचण्यास सुरुवात केली. देशात आग लागलीय, कूटनीतिक स्तरावर पाकिस्तान पुरता फसलाय अन् ख्वाजा साहेबांना मर्लिन मुनरोची घड्याळ शोधायला वेळ आहे? असा सवाल नागरिकांमधून केला जाऊ लागलाय.
अन् पोस्ट डीलिट
अवघ्या काही तासातच ख्वाजा साहेब एवढे ट्रोल झाली की त्यांना ही पोस्टच डीलिट करावी लागली. पण तोपर्यंत याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता. त्याची चर्चाही सुरू झाली होती. जोरदार ट्रोलिंग सुरू झाली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा एक चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे, सार्वजनिक पदावर असलेल्या नेत्यांनी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असताना किती सतर्क राहिलं पाहिजे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. पत्रकार नादिर बलोच यांनीही या फोटोवर टिप्पणी केली आहे. या फोटोतील आधुनिक स्मार्ट वॉच ही एकमेव गोष्ट आहे, जी 1950 मध्ये नव्हती, असं नादिरने म्हटलंय. नागरिकांनी नादिरचीही टिंगलटवाळी करण्यास सुरुवात केली आहे.
