
Donald Trump : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केलेल्या भारताच्या दौऱ्याची संपूर्ण जगात चर्चा होत आहे. पुतिन यांनी आपल्या दौऱ्यात भारतासोबत अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. भारताचा रशियासोबतचा व्यापार कमी व्हावा म्हणून अमेरिकेकडून भारतावर मोठा दबाव टाकला जात आहे. याच दबावाचा एक भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त टॅरिफ लागू केला. व्यापारातील अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच रशियाला कोंडीत पकडण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून भारताला सापत्न वागणूक दिली जात आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानसाठी मात्र पायघड्या घातल्या जात आहेत. असे असतानाच आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव वाढत आहे. ट्रम्प यांनी भारताची माफी मागावी, अशी मागणी अमेरिकेतूनच होत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाला त्यांच्याच देशातून विरोध होत आहे. तेथे अनेक राजकीय नेते, आजी-माजी प्रशासकीय अधिकारी त्यांचा विरोध करत आहेत. भारतावर लादलेल्या टॅरिफचा तर तिथे कडाडून विरोध केला जात आहे. अलिकडेच एकूण 44 सिनेटरने एकत्र येत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांना पत्र पाठवले. या पत्रात मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर याच्यावर बंदी घालावी, अशी मागणी केलीहोती. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबीन यांनी तशी मागी केली असून ट्रम्प यांचे पाकिस्तानवरील प्रेमी निरर्थक आहे. असीम मुनीर याला थेट दहशतवादी म्हणून घोषित करावं, असं म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला बिगर-नाटो सहकारी देश म्हणून घोषित केलेलं आहे. त्यावरही रुबीन यांनी भाष्य केले असून ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकेची पाकिस्तानसोबतची जवळीक ही चुकीची आहे. या देशाला दहशतवादी देश म्हणून घोषित केलं पाहिजे, असं मत रुबीन यांनी व्यक्त केलं. तसेच अमेरिकेचा भारतासोबतचा व्यवहार चुकीचा आहे. अमेरिकेने भारताची माफी मागायला हवी. भारताने रशियाकडून तेल खरेदी करून नये म्हणून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. हा खूपच चुकीचा निर्णय आहे. या निर्णयामुळे भारताची माफीच मागितली पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प यांना माफी मागायला आवडत नाही. पण अमेरिकेचे हीत हे ट्रम्प यांच्या अहंकारापेक्षा मोठे आहे, असं मत रुबीन यांनी व्यक्त केलं. दरम्यान, आता पुढे काय-काय होणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.