Portugal Burqa Ban : मोठी बातमी! आता बुरख्यावर बंदी, नियम मोडल्यास 4 लाखांचा दंड, विधेयक मंजूर!
बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यासाठी आता विधेयक मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Portugal Burqa Ban Law : युरोपातील अनेक देशांत सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यास मनाई आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. या नियमाचे काही लोकांकडून समर्थन केल जाते. तर काही राजकीय पक्ष, मुस्लीम धर्मीय या नियमाचा कठोर विरोध करतात. दरम्यान, आता आणखी एक देश अशाच प्रकारचा कायदा आणण्याची दाट शक्यता आहे. कारण या देशाने अशा प्रकारचा कायदा करण्यासाठी थेट संसदेत विधेयक मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांनी आता बुरखा परिधान केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमाचे उल्लंघन केल्यास या विधेयकात महिलेकडून 4 लाख रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्याची तरतूदही आहे.
नेमका काय निर्णय घेण्यात आला?
मिळालेल्या निर्णयानुसार बुरखाबंदीचा हा निर्णय पोर्तुगाल या देशाकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी एक विशेष कायदा केला जात आहे. हा कायदा आणण्यासाठी अगोदर पोर्तुगालमधील सरकारने संसदेत एक विधेयक आणले आहे. हे विधेयक आता मंजूरही करण्यात आले आहे. लवकच हे विधेयक पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सुसा यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येऊ शकते. त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यावर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. हे विधेयक सखोल चर्चा आणि विश्लेषणासाठी पोर्तुगालच्या संवैधानिक न्यायालयाकडेही पाठवले जाऊ शकते. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास पोर्तुगाल हा देश ऑस्ट्रिया, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड यासारख्या युरोपीय देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. युरोपातील या देशांत महिलांना चेहरा पूर्ण किंवा अर्धवट झाकण्यावर बंदी आहे.
विधेयकाला मंजुरी मिळाली, आता…
पोर्तुगालमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोर्तुगालमधील सार्वजनिक ठिकाणांवर लिंगावर आधारित किंवा धार्मिक कारणामुळे बुरखा परिधान करण्यावर प्रतिबंध घालण्याच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव अतिउजवी विचारधारा असणाऱ्या चेगा पार्टीने आणला. नकाब, बुरखा अशा वस्त्रांना सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्यावर प्रतिबंध घालणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
नेमकी शिक्षा काय मिळणार?
या विधेयकात नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद केलेली आहे. विधेयकानुसार सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान केल्यास महिलेला 200 पासून ते 4000 युरोपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास महिलांना नियमांचे उल्लंघन केल्यास 4 लाख 10 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.
विधेयकावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया
दरम्यान, आता हे विधेयक मंजूर झाले असले तरी जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही लोकांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे. तर काही लोकांनी हे विधेयक म्हणजे लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला करण्याचेच काम आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे आता विधेयक मंजूर झाले असले तरी त्याचे कायद्यात रुपांतर होणार का?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
